कऱ्हाड : केंद्र सरकार व निती आयोगाच्यावतीने उंडाळे, ता. कऱ्हाड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची अटल टिंकरिंग लॅबसाठी निवड झाली. लॅबच्या उभारणीचा प्रारंभ संस्थेचे संचालक अॅड. आनंदराव पाटील, प्राचार्य बी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभारी पर्यवेक्षक जे. एस. माळी, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. जीवन फुके, प्रा. सुरेश वेदपाठक, सतीश सावळकर, बादशाह शेख आदी उपस्थित होते. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित अर्थात स्कीम या संकल्पनेवर आधारित या टिंकरिंग लॅबमधून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे नावीन्यपूर्ण प्रयोग करता येणार आहेत.
कऱ्हाडात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
कऱ्हाड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त येथील खराडे कॉलनीत अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल खराडे, तुषार खराडे, बबन भोसले, रवी कांबळे, अमोल बनसोडे, राहुल काळे, अप्पा कदम, विठ्ठल भिसे, सागर गवळी, विनायक घेवदे, सदाशिव खराडे, चेतन करंडे, अनिकेत दुपटे, शुभम कदम, रामभाऊ महापुरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तळमावले विभागात श्वानांची दहशत कायम
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील तळमावले विभागात पिसाळलेल्या श्वानांची दहशत कायम आहे. विभागात अनेक वेळा पिसाळलेल्या श्वानांनी ग्रामस्थांसह गायी, शेळ्या तसेच कोंबड्यांचा चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. ताईगडेवाडी, धुमाळवाडी, साईकडे, मानेगाव या गावांमध्ये पिसाळलेल्या श्वानांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच या श्वानांनी पाच ते सहा जणांचा चावा घेतला आहे.