उंडाळे, ता. कऱ्हाड येथे उंडाळकर कुटुंबीयांकडून नवा पायंडा पाडण्यात आला. अंत्यसंस्काराची रक्षा पाण्यात न टाकता ती वृक्षांच्या बुंध्याला टाकून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच प्रदूषणमुक्तीचा संदेशही देण्यात आला. स्वच्छता अभियान व वृक्षारोपण हे दोन महत्त्वपूर्ण विषय विलासराव-पाटील उंडाळकर यांच्यासाठी जिव्हाळ्याचे होते. ते त्यांनी आयुष्यभर जपले. महात्मा गांधी जयंतीदिनी दरवर्षी ते कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील एका गावात सर्व ग्रामस्थांना एकत्र करून ग्रामस्वच्छता अभियान राबवत होते. याशिवाय त्याच गावात वृक्षारोपण कार्यक्रम घेत होते. त्यामुळे हाच विचार पुढे नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसरासह शिवारात आंब्याची व वडाची रोपे लावली.
याशिवाय निसर्गाचा समतोल रहावा. नदीतील पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी रक्षा पाण्यात विसर्जित न करता ती वृक्षारोपण करून शेतात वापरण्यात आली. कुटुंबीयांच्यावतीने त्यांची कन्या उर्मिला निंबाळकर, स्रुषा सुचित्रा उदयसिंह पाटील, पुत्र उदयसिंह पाटील, नातू अधिराज पाटील, यशराज निंबाळकर, नात चेतना पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून एक नवा संदेश देण्यात आला.
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : उंडाळे, ता. कऱ्हाड येथे उंडाळकर कुटुंबीयांच्यावतीने वृक्षारोपण करून रक्षा रोपांच्या बुंध्याला विसर्जित करण्यात आली.