नितीन काळेल
सातारा : गावांचे अनेक प्रश्न, तसेच लोकांच्याही अडचणी असतात, हे सोडविण्यासाठी विकासकामे होतात. त्यासाठी शासनाकडूनही निधी मिळतो. आताही १५व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींना २०२१-२२ या वर्षासाठी तब्बल ६७ कोटी ७५ लाखांचा निधी मिळालाय. यामधून गावागावांत नैसर्गिक स्रोत बळकटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गावची कामे होणार आहेत.
ग्रामपंचायतींना कर रूपाने पैसे कमी मिळतात. त्यामुळे विकासकामे करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. परिणामी गावात सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाहीत; पण अलीकडील काही वर्षांत ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी मिळत आहे. यातून गावांत विकासकामे मार्गी लागत आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींनाही प्रत्येकी १० टक्के निधी मिळतो. हे पैसेही सदस्यांमार्फत विकासकामांसाठी खर्च होतात. त्यामुळे गावांत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत.
असा मिळणार निधी
६७,७५,५१९,८७ - ग्रामपंचायतींना मिळणार
८,३८,२५,००० - जिल्हा परिषदेला मिळणार
८,३८,२५,००० - पंचायत समितींना मिळणार
निधीतून विविध कामे करता येणार...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दोन हप्त्यांत ६७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामधून विविध कामे करता येणार आहेत. पाणीपुरवठा योजना उद्भवात वाढ करणे, पाणलोट क्षेत्रात काम. शाळा, अंगणवाडीत पाणीपुरवठा उपलब्ध करणे, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर. पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधणे, सांडपाणी नाल्याचे बांधकाम करणे, आदी कामे करण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतींनी शासन निर्देशानुसार ६० टक्के बंधित निधीतून स्वच्छतेसंदर्भात कामांचे नियोजन करताना घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनावर भर द्यावा. तसेच गावांना ‘कचरा डंपिंग’ची गरज पडणार नाही असे नियोजन करावे. सार्वजनिक इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे १०० टक्के करावीत. ग्रामपंचायतींनी नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनावर भर द्यावा. त्याचबरोबर पर्यावरणपूरक विकासाच्यादृष्टीने पावले उचलावीत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापित गावाचे उद्दिष्ट समोर ठेवावे. - अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत
तालुकानिहाय ग्रामपंचायती
माण ९५
खटाव १३३
फलटण १३१
सातारा १९१
कऱ्हाड २००
पाटण २३४
वाई ९९
जावळी १२५
महाबळेश्वर ७९
खंडाळा ६३
कोरेगाव १४२