शिरवळ : ‘दारूविक्रीचा परवाना देतो,’ असे सांगून १ कोटी १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सचिन हंबीरराव पाटील (रा. वाटेगाव, ता. वाळवा जि. सांगली) असे अटक केलेल्या मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोगस संचालकाचे नाव आहे. दरम्यान, सचिन पाटील याला न्यायालयाने दि. १६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावलीे. नोव्हेंबर २०१३ मध्ये भोर येथील धनंजय शिरवले या व्यक्तीमार्फत फसवणूक झालेल्या तक्रारदारांची सचिन पाटील याच्याशी ओळख झाली होती. त्यानुसार सचिन पाटील याने तक्रारदारांना माझ्याकडे शासनाने जप्त केलेले दारूविक्रीचे ९ परवाने असल्याची बतावणी करत मुंबई मंत्रालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संचालकपदी कार्यरत असल्याचे सांगितले होते. पाटील याच्या बतावणीला भुलून संबंधितांनी त्याला १ कोटी १३ लाखांची रक्कम २०१३-१४ मध्ये दिली. यावेळी पाटील याने ‘दारू परवाना तीन-चार महिन्यांत देतो,’ असे सांगितले. वरील कालावधीनंतर तक्रारदारांनी सचिन पाटील याच्याशी संपर्क साधला असता तो केवळ आश्वासन देत राहिला. रक्कम मागितली असता सचिन पाटील याने तक्रारदारांना दोन वेगवेगळे वीस लाख व सात लाखांचे धनादेश दिले असता तेही धनादेश न वटता परत आले. तत्पूर्वी पाटील याने तक्रारदारांना परवानाचे पत्र पाठवले असता तेही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झाल्याचे समोर येताच तक्रारदारांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
दारूविक्रीच्या परवान्याखाली शिरवळला कोटीची फसवणूक
By admin | Published: July 13, 2016 11:34 PM