नागठाणे : नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये आतापर्यंत १२४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे बोरगाव पोलिसांकडून बंदोबस्तासोबतच मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागठाणे परिसरातील बाजारपेठेचे मोठे गाव असून भागातील पन्नास गावांतील ग्रामस्थ नियमित येत असतात. नागठाणे आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सहा उपकेंद्र असून त्यामध्ये सर्व मिळून भागातील पंचवीस गावे आहेत. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रातून वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा पाहिल्यानंतर आजमितीस १२४९ कोरोनाबधित रुग्ण आढळले.
काही दिवसांपूर्वी नागठाणे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील व्यापारी, दुकानदारांची कोरोना चाचणी केली आहे, अशी माहिती सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे यांनी दिली. तेव्हा सहाजण बाधित आढळून आले होते. सध्या ग्रामपंचायतीने दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लावला आहे.
ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर तसेच सॅनिटायझरचा वापर करणे अतिमहत्त्वाचे असून शासन नियमांचे पालन करण्याबाबत लोकांना वेळोवेळी सूचित केले जात आहे. तरीही नागरिक, तरुणांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी बोरगाव पोलिसांनी बंदोबस्तासोबतच आता मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उभारणे ही गोष्ट महत्त्वाची झाली असून कारवाईची सुरुवात झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावणार नाहीत.
चौकट :
नागठाणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या गावांतील सर्व नागरिकांनी शासन नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व कोरोना लसीकरण अत्यावश्यक आहे; परंतु त्यावर बोरगाव पोलीस स्टेशनकडून बंदोबस्तासोबतच पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उभारणे खूप महत्त्वाचे आहे.