सातारा : येथील पोवई नाका ते भाजी मंडई या मार्गावर एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्याकडील २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुभद्रा शिवाजी वाघमोडे (वय ७२, रा. आरळे, ता. सातारा) या पोवईनाका ते भाजी मंडई यारस्त्याने चालत जात होत्या. यावेळी त्यांच्या जवळून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने रस्त्यावरची पुढी उचलली आणि तो पळून गेला. याचवेळी तेथे दोन आणखी व्यक्ती आल्या. त्या दोघांनी आल्या-आल्या एक व्यक्ती पळून गेलेली तुम्ही पाहिली का आणि ती कुठे गेली हे आम्हाला दाखवा, अशी विनंती केली.दरम्यान पळून गेलेला व्यक्तीच तिथे आला आणि त्याने हातातील पुढी सुभद्रा यांच्या हातात देत, ही सोन्याचे बिस्किट घ्या पण तुमच्याकडील सोन्याचे दागिने मला द्या, असे सांगितले. संबंधित व्यक्तीच्या बोलण्यावर सुभद्रा यांचा विश्वास बसला आणि त्यांनीही त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व अंगठी काढून दिली. यानंतर सुभद्रा यांच्या हातात सोन्याचा कागद लावलेला धातूचा तुकडा दिला आणि ते निघून गेले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुभद्रा यांनी याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार केळगणे हे करीत आहेत.
सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 7:41 PM