लोणंद : ‘लोणंदमधील सर्व नागरिक, नगरसेवक व शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरातीलच सोहळा आहे, असे समजून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन वाईच्या उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले.
लोणंद येथे नगरपंचायत सभागृहात शुक्रवारी आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार विवेक जाधव, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, हणमंतराव शेळके-पाटील, गटनेते योगेश क्षीरसागर, नगरसेविका कुसुम शिरतोडे, बांधकाम विभाग, वीज वितरण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
मोरे म्हणाल्या, ‘लोणंद येथील पालखी सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी सर्वच यंत्रणांनी स्वयंस्फूर्तीने काम केले पाहिजे. या सोहळ्यात येणाºया वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोहळा आनंदीमय वातावरणात पार पडेल. या सोहळ्यात कोणत्याही प्रशासकीय कर्मचाºयाने कामाच्या बाबतीत हयगय केल्यास त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.’
तहसीलदार जाधव म्हणाले, ‘पालखीतळावर दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यासाठी भाविकांना यावेळी स्वतंत्र रस्ता करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेर पडताना अडचणी येणार नाहीत. दहा ठिकाणी साडेसहाशे फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत भाविकांना सुविधा देण्यात येणार आहेत. प्रकाशासाठी पालखी तळावर हायमास लाईटची व्यवस्था, तीन पर्यायी बस डेपोची व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेत योग्य ते बदल करून एक आदर्श पालखी सोहळा पार पाडण्यात येणार आहे.’
दिघावकर म्हणाले, ‘लोणंद येथे कोणत्याही ठिकाणी गर्दी, अपघात होणार नाहीत याचे संपूर्ण नियोजन केले आहे. लोणंदमधील रस्ते अरुंद असून अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे.’पालखीतळाच्या सपाटीकरण तसेच गावातील रस्ते, रस्त्याच्या कडेची वाढलेली बाभळीची झुडपे काढणे, चिखल होतो तेथे मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगितले.मागील वर्षी खेमावती नदीला आलेल्या पुरात तीनजणांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे पालखी पूर्वी खेमावती नदी स्वच्छ करावी.- हणमंतराव शेळके-पाटील नगरसेवक