सातारा : अंजली कॉलनीमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी जलवाहिनी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेली. याबाबतची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने नवीन जलवाहिनी बसवून या भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
सातारा शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शहर, उपनगर आणि तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. सातारा येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या अंजली कॉलनीमधील जलवाहिनी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेली होती. त्यामुळे प्रतापगंज पेठ, राधिका टॉकीज परिसर आणि बुधवार नाका परिसराला पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
याबाबतची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीताराम हादगे, नगरसेवक शकील बागवान, मुख्य अभियंता दिलीप छिद्रे, पाणीपुरवठा अभियंता अनिरुद्ध गाढवे, सुपरवायझर संदीप सावंत आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित जलवाहिनी सातारा येथे उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच सीता हादगे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित जलवाहिनी तत्काळ पुणे येथून उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. शनिवारी जलवाहिनी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने नवी जलवाहिनी बसवून या भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. राधिका रोड, बुधवार नाका परिसरातील नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले आहे
फोटो : २५ सातारा पालिका
अंजली कॉलनी येथे पुरात वाहून गेलेल्या जलवाहिनीच्या जागी सातारा पालिकेकडून नवीन जलवाहिनी बसविण्यात आली.