रहिमतपूर : ‘बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न दहा तोंडी रावणासारखे राज्यापुढे उभे आहेत. राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत आड येणाऱ्या दहातोंडे रावणाचा वध करीत पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल,’ असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे क-हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम व लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे.’यावेळी उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, नितीन बानगुडे-पाटील, कांताताई नलवडे, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, अॅड. विशाल शेजवळ, नगरसेविका रुक्मिणी सुतार, चित्रा महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भीमराव पाटील, सुनीता कदम, पंचायत समितीच्या सदस्या विजया गुरव, रवींद्र भोसले, पक्षनेते रामकृष्ण वेताळ, संपतराव माने व ग्रामस्थ उपस्थित होते.रहिमतपूर येथे शनिवारी झालेल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, नितीन बानगुडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.