सातारा : कायद्याचे बंधन न जुमानता होऊ घातलेला नवीन महाबळेश्वर प्रकल्प, धनदांडग्यांनी खरेदी करून ठेवलेल्या जमिनी, होत असलेली बेसुमार वृक्षतोड त्याकडे होत असलेलं शासनाचा दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर कोयना व पुष्प पठार कासचा जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा काढून घ्यावा, अशी मागणी आपण युनेस्कोकडे करणार आहोत, अशा शब्दात कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी आपला उद्वेग व्यक्त केला.कोयनेसह कासला जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा मिळावा, यासाठीचा अभ्यासपूर्ण प्रकल्प अहवाल ज्या तीन तज्ज्ञांनी सर्वप्रथम केला होता त्यापैकी डॉ. मधुकर बाचूळकर हे एक आहेत. ‘कोयना अभयारण्य, कास पठार यांना २०१२’मध्ये जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला.शासनास पर्यावरण, वन्यजीव, जैवविविधता यांच्या संरक्षण संवर्धनाबाबत कोणतीही आपुलकी, आस्था नाही, हे सुस्पष्ट आहे. या परिसरास मिळालेला वारसा स्थळांचा आंतरराष्ट्रीय बहुमान टिकवून ठेवण्याची शासनास आवश्यकता वाटत नसेल, शासनाची तशी इच्छाच नसेल, तर मी युनेस्को संस्थेस सविस्तर निवेदन पाठवून कास पठार व कोयना अभयारण्यास दिलेला नैसर्गिक वारसा स्थळ हा आंतरराष्ट्रीय बहुमान काढून घ्यावा, अशी विनंती करणार आहे, असेही प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी म्हटले आहे...तर जैवविविधता नष्ट होईलआता राज्य शासन कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कास पठार आणि सभोवतालच्या परिसरात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प सुरू करणार आहे. यामुळे येथील जैवविविधता नष्ट होणार आहे. येथील वन्यजीवांवर पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होणार आहे. या परिसरातील जमिनी अनेक धनदांडग्या लोकांनी विकत घेतल्या आहेत. त्यांनी वृक्षतोड, जंगलतोड सुरू केली आहे. पण, वनविभाग व शासनाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. शासनास फक्त महसूल मिळवायचा आहे, असा स्पष्ट आरोप डॉ. बाचूळकर यांनी केला आहे.
पर्यटनातून शासनास लाखो रुपये मिळाले. पण, त्यांनी पठाराच्या संवर्धनासाठी एक रुपयाही खर्च केला नाही. पर्यटनातून तेथील गावांना, गावकऱ्यांना भरपूर आर्थिक फायदा झाला. पर्यटनातून शासनास काही खर्च न करता मोठा महसूल मिळाला म्हणून शासन निसर्ग पर्यटनास चालना देत आहे. पण, हे पर्यटन निसर्गाची वाताहात करणारे ठरत असून, भविष्यात ही समृद्धता लोप पावेल. - प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर वनस्पती शास्त्रज्ञ, कोल्हापूर