सातारा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडाला शुक्रवारी ‘युनेस्को’च्या पथकाने भेट दिली. या पथकाने किल्ल्यावरील दरवाजा, मुख्य बुरुज, चोर वाटा, तलाव, मंदिर तटबंदी व अन्य संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. साडेतीनशे वर्षांनंतरही प्रतापगडाची योग्य ती जपणूक केल्याबद्दल तसेच सण-उत्सवाची परंपरा अबाधित ठेवल्याबद्दल युनेस्को’च्या पथकाने सेवेकऱ्यांचे भरभरून कौतुक केले.महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश जागतिक वारसास्थळ यादीत करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारने ‘युनेस्को’ला पाठविला आहे. या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाचा समावेश आहे. या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी ‘युनेस्को’चे पथक पुणे जिल्ह्याचा दौरा आटोपून साताऱ्यात आले. सकाळी ९ वाजता हे पथक किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी दिल्ली व महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पथकाने बारकाईने पाहणी करताना माहितीही जाणून घेतली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विश्रामगृहात किल्लेदार, पालखीचे भोई, मंदिराचे सेवेकरी तसेच तरुणांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्नही विचारले. या प्रश्नांना सर्वांनी समर्पक उत्तरे दिली. येथील तरुणांना कसण्यासाठी शेती नाही. त्यांची रोजी-रोटी पर्यटकांवरच अवलंबून आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळात समावेश झाल्यास छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल.किल्ल्यावर पर्यटन वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील. त्यामुळे किल्ल्याचा वारसास्थळ यादीत समावेश करावा, अशी मागणी तरुणांनी ‘युनेस्को’कडे केली. साडेतीनशे वर्षांनंतरही भक्कम असलेली किल्ल्याची तटबंदी तसेच सेवेकऱ्यांनी अबाधित ठेवलेली सण-उत्सवाची परंपरा याचे ‘युनेस्को’च्या पथकाने कौतुक केले. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबर व परिसराची देखील या पथकाने पाहणी केली.