नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, त्यातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात २७९५ ठिकाणचे पाणी नमुने घेतले होते. त्यामधील ७६ ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित असल्याचं स्पष्ट झालंय.पाणी हेच जीवन म्हटले जात असलेतरी आजही स्वच्छ व पुरेसे पाणी योग्य प्रमाणात मिळते, अशी स्थिती नाही. त्यातच गावातील लोकांना नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत असले तरी वाडी वस्तीवर आजही अनेक ठिकाणी असे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाडीवरील ग्रामस्थ विहिरी, हातपंप, बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवतात. जिल्ह्याचा विचार करता यंदा माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत दुष्काळाची भीषणता आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. फरक एवढाच की टँकरग्रस्त गावांची संख्या कमी अधिक आहे. सर्वात अधिक माण तालुक्यातील ७६ गावांना टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यात २५० हून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा होतोय.या टँकरद्वारे मिळणारे पाणी हे किती शुद्ध असेल, हे ठामपणे सांगणेही अवघड आहे. कारण, तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या फिडिंग पॉर्इंटवरून पाणी टँकरमध्ये भरून ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाण्यात गढूळपणा दिसून येतोच. तरीही लोकांना चांगले पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभाग दक्ष असतो. त्यासाठी दर महिन्याला निश्चित केलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येतात. एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाने २७९५ ठिकाणचे नमुने घेतले. त्यातील ७६ ठिकाणचे नमुने हे दूषित निघाले. याचा अर्थ हे पाणी लोकांना पिण्यासाठी योग्य नाही, असाच आहे.सातारा तालुक्यातील ३७२ ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १ नमुना हा प्रयोग शाळेतील तपासणीत दूषित निघाला. तर जावळी तालुक्यात २३९, महाबळेश्वर १३९ नमुने घेतले; पण एकही दूषित आला नाही. वाई तालुक्यात १५६ पैकी ९ नमुने दूषित आले. खंडाळा ५० पैकी २, माण ३१० पैकी १, पाटणला ३१८ पैकी ४ ठिकाणचे नमुने हे दूषित पाणी असणारे आले आहेत.फलटण, कºहाड, खटाव अन्कोरेगावमध्ये अधिक दूषित नमुने...जिल्ह्यातील फलटण, कºहाड, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील पाणी नमुने इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक दूषित आलेत. फलटणमध्ये २३५ पैकी १६, खटाव ४६५ मधील १३, कोरेगावला २३६ पैकी ११ तर कºहाडला २७५ मधील १९ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झालं आहे.
जिल्ह्यातील ७६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:20 PM