लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सर्वसामान्यांना सातत्याने येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व राष्ट्रवादीची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पदे दिली आहेत. लग्नपत्रिकेत टाकण्यासाठी आणि सत्कार घेण्यासाठी ही पदे नाहीत, कामाकडे दुर्लक्ष केले गेल्यास दिली तशी पदे काढूनही घेतली जातील,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे कान उपटले. तसेच ज्यांनी केवळ जागा अडविली आहे, ते पदाधिकारी राष्ट्रवादीला नकोत, असेही त्यांनी सांगितले. साताऱ्यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निरीक्षक सुरेश घुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, राज्य सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दादाराजे खर्डेकर, सत्यजीतसिंह पाटणकर, बाळासाहेब भिलारे, राजाभाऊ उंडाळकर, दत्ता उत्तेकर, पांडुरंग पोतेकर, सुरेंद्र गुदगे, राजेश वाठारकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीने दिलेल्या पदांच्या माध्यमातून टीम वर्क दिसायला पाहिजे. सातत्याने एकाच घरात पदे दिली की टीका होते. इतरांना संधी नको का? म्हणूनच नवीन लोकांना संधी देण्यात आली आहे. जितेंद्र पवार, सतीश फडतरे आदींनी पक्ष सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. त्यांची त्या पक्षात काय अवस्था झाली आहे, ते त्यांना खासगीत जाऊन विचारा, तेव्हाच आपल्या पक्षाने दिलेल्या पदाचे महत्त्व तुम्हाला समजेल. पावसानंतर वापसा येतो, तेव्हा पेरणी होते.अशी पेरणी करा की उगवल्यानंतर सर्वत्र राष्ट्रवादीचेच पीक दिसायला हवे, पदे देण्याचा निर्णय घेणे म्हणजे अवघड जागेचे दुखणे आहे.’पदे दिली आहेत त्यांनी प्रपंचाचे काम बघत संघटनेचे काम पुढे न्यायला हवे. साताऱ्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यामध्ये सकारात्मक सूर पाहायला मिळाला. आगामी काळात वक्ता प्रशिक्षण सेलच्या माध्यमातून पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचे शिबीरही लवकरच घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती. राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे सरकार सुतासारखे सरळ झाले. आता पुन्हा आकडेमोडीचा खेळ करणाऱ्या सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे, झाली आहे,’ अशी टीकाही अजित पवार यांनी केली.गद्दारी केली त्यांची यादी द्याज्यांना पक्षाने पदे देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, अशा मंडळींची यादी अजित पवार यांनी मागवून घेतली. त्यांच्यावर भविष्यात कारवाई होण्याची शक्यता वर्तविली.घरातल्या भांड्यांचा आवाज बाहेर नकोघरात जसे भांड्याला भांडे लागते, त्याचप्रमाणे पक्षामध्ये अंतर्गत वाद होत असतात. पण ते घराबाहेर जाऊ नयेत, भांड्याचा आवाज घराबाहेर जाऊ देऊ नका, असा सल्लाही पवार यांनी दिला. सरकारने जाहीर केलेली दूध दरवाढ म्हणजे पाय बांधून पळण्याची शर्यतसरकारने जाहीर केलेली दूध दरवाढ म्हणजे पाय बांधून पळण्याची शर्यत आहे, अशी टीका करताना अजित पवार म्हणाले, ‘सरकारने दुधाचा दर ३ रुपयांनी वाढविला आहे. मात्र सरकारच्या ताब्यात एकही सहकारी दूध संघ नसल्याने राजकारण करत शेतकऱ्यांना दूधाचा दर वाढवून द्यायचा, मात्र, विक्रीत कोणतीही वाढ करायची नाही, अशी धमकी शासनाने दूधसंघांना दिली आहे.’आबा कारखाना ताब्यात घ्याजिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र काही संस्था अजूनही आपल्या ताब्यात नाहीत, असे म्हणत मकरंद आबा वाईतील कारखाना ताब्यात घ्या, असेही अजित पवार यांनी सूचविले.किल्ला जिंकायचायसातारचा बुरुज मजबूत आहे. आगामी काळात रायगड व शिवनेरीचा किल्ला जिंकण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असेही पवार यांनी आवाहन केले. राष्ट्रवादीचे झेंडे लावाराष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर राष्ट्रवादीचा झेंडा लावावा, गावातून कोणताही नेता गेला तरी त्याला हा झेंडा पाहून आपलेपणा वाटला पाहिजे, असे पवार म्हणाले.संजीवराजेंची बाजू उजवी म्हणूनच..जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देताना संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची बाजू उजवी ठरली. चोख, पारदर्शी व स्वच्छ कारभार करुन ते बोट दाखवायलाही जागा ठेवणार नाहीत, याची खात्री असल्याचे पवार म्हणाले.
लग्नपत्रिकेत छापण्यासाठी पक्षाची पदे नकोत
By admin | Published: July 04, 2017 11:13 PM