सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाने बसस्थानक ते पोवई नाका मार्गावरील हॉकर्सची अतिक्रमणे चौपदरीकरणासाठी हटविली असली, तरी मागण्या मान्य होईपर्यंत दररोज एकत्र येण्याचा निर्धार हॉकर्सनी केला आहे. त्यासाठी जुन्याच जागी शेड उभारून प्रत्येकाने दररोज तेथे येऊन ‘हजेरी’ द्यायची असा निर्णय घेण्यात आला असून, गर्दी आणि घोषणांमुळे धरणे आंदोलनासारखा माहोल तयार झाला आहे. चौपदरीकरणाच्या कामास हॉकर्सचा विरोध नाही. अतिक्रमण हटाव मोहिमेस त्यांनी शनिवारी सहकार्य केले. तहसीलदार कार्यालयाच्या मागील गेटजवळ नवा हॉकर्स झोन उभा राहत असून, त्याचे काम सुरू आहे. सध्या तेथे खडीकरण झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, व्यवसायानिमित्त रोज होणारी भेट यापुढेही कायम ठेवायची आणि हॉकर्स झोन तयार होईपर्यंत न्यायासाठी संघर्ष करीत राहायचे, असे हॉकर्स संघटनेने ठरविले आहे. यातील प्रत्येकालाच व्यवसायासाठी तूर्तास नवी जागा शोधावी लागत आहे. परंतु विस्थापित झालो, तरी विभक्त होणार नाही, असा बाणा त्यांनी कायम ठेवला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, कमी उत्पन्नगटातील व्यक्तीला रस्त्याकडेला व्यवसाय करण्याची मुभा आहे. तथापि, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित होण्यास हॉकर्सनी तयारी दर्शविली आहे. मात्र, हॉकर्स झोनचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, तो कधी पूर्ण होईल हे तेथे काम करणाऱ्यांनाही सांगता येत नाही. त्यामुळे जागा पदरात पडेपर्यंत हॉकर्सनी एकमेकांपासून दूर जाऊ नये आणि मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवावा, यासाठी दररोज हजेरी देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी दिली. (प्रतिनिधी)पुन्हा दिसू लागले हातगाडे, छत्र्याशनिवारी अतिक्रमणे हटविल्यानंतर प्रशस्त वाटणाऱ्या बसस्थानक-पोवई नाका रस्त्याचे सोमवारचे स्वरूप काही वेगळेच होते. हळूहळू तेथे फळांचे आणि अन्य वस्तूंचे हातगाडे दिसू लागले आहेत. पूर्वीप्रमाणेच काहींनी व्यवसाय सुरू केला आहे. रंगीबेरंगी छत्र्याही या रस्त्यावर दिसू लागल्या असून, त्या सावलीत अनेक व्यवसाय सुरू आहेत.
विस्थापित होऊ; विभक्त नाही!
By admin | Published: February 02, 2015 9:59 PM