सातारा : कोरोना महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नांमुळे बारामती परिमंडलाने सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील ९५ टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळाने बारामती परिमंडलातील ५६ वीज उपकेंद्रांना ठप्प केले होते. मात्र, महावितरणने यंत्रणा युद्धपातळीवर राबवून सर्व वीज उपकेंद्रे व त्यातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. कोरोना रुग्णालये, केअर सेंटर, ऑक्सिजन प्लांट आदी अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा काही तासांतच सुरु केला होता. यामध्ये ५४ उपकेंद्रे दुसऱ्याच दिवशी सुरु झाली. मात्र, महाबळेश्वरमधील वेण्णालेक व कोळीआळी जीआयएस उपकेंद्रे सुरु होण्यास वारंवार अडथळे येत होते. उशिरा ही दोन्ही उपकेंद्रे पूर्ववत झाली.
बारामती परिमंडलात ७ लाख २४ हजार ३८८ ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळाने विस्कळीत झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत ७ लाख १२ हजार ४२० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यासाठी ६२३ विजेचे खांब उभे करण्यात आले. बाधित झालेल्या १ हजार ४३८ पैकी १४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. अद्याप गावाबाहेर, डोंगरात वस्ती करून राहिलेल्या १४५ रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे बाकी आहे.
बारामती परिमंडलात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. सातारा जिल्ह्यातील ४ लाख ५४ हजार ५९५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील ४ लाख ४२ हजार ७५८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप महाबळेश्वर व पाचगणी भागातील ८ हजार व कऱ्हाड विभागातील ३१०० ग्राहकांच्या वीजपुरवठ्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. याकामी महावितरणचे व ठेकेदारांचे मनुष्यबळ अहोरात्र परिश्रम घेत आहे.
कोट :
कोविड काळात सामान्यांना घरात बसू वाटेल, अशी व्यवस्था महावितरणमुळेच होऊ शकली. महामारीच्या या काळात प्रचंड उत्साह आणि उमेदीने महावितरणच्या शेवटच्या फळीपर्यंत सर्वांनी काम केले. तौक्ते वादळाने केलेली दैनाही आमच्या माणसांनी चोवीस तासात दुरूस्त करून आमची कार्यक्षमता सिध्द केली.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा