नसीर शिकलगार
फलटण: रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हवाई पाहणी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज, सोमवारी पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली.मंत्री शेखावत यांनी सकाळी हेलिकॉप्टर मधून फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्याची पाहणी सुरू केली. निरा देवघर सिंचन प्रकल्पाला नुकतीच सुमारे ३९०० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेषतः फलटण व माळशिरस तालुक्याला याचा फायदा होणार आहे. म्हणूनच सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी खासदार नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. तर, अनेक वर्षे प्रलंबित असलेली व महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भागाला तारणहार ठरलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना सध्या रखडलेली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादच्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला खो बसला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मंत्री शेखावत यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती खासदार नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. त्या अनुषंगाने हवाई दौरा सुरू आहे. पंढरपूर येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकचा तपशील मंत्री शेखावत देणार असल्याचे खा. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.