कऱ्हाड : कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी शासनासह विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापरही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कऱ्हाडमधील दोन युवकांनी जनजागृती करण्यासाठी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सध्या शहरात चांगलीच चर्चा असून, पालिकेनेही त्याचे फलक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावले आहेत.
कऱ्हाडचा रहिवासी व आर्ट कंपनीचा संस्थापक, कार्यवाहक निखील खोत हा मलकापूर येथील यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचा मित्र अभिषेक माने याने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे. या दोघांच्या सहकार्यातून ही सर्व संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यांनी तयार केलेले कॅम्पेन सामाजिक बांधिलकी म्हणून पालिकेला भेट दिले आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य विभागामार्फत त्याचे फलक करून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावले आहेत. हे जनजागृती फलक सध्या लक्ष वेधत असून, याद्वारे कोरोनाबाबत जनजागृती होत आहे.
कोरोनाबद्दल असंख्य गोष्टी सांगण्यात आल्या तसेच त्याचा संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावर मोठमोठ्या मोहिमा व योजनाही राबविण्यात आल्या. मात्र, कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाही. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग यासारखे उपायही अवलंबण्यात आले. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे लोकांना बराच मोकळा वेळ मिळाला. त्याचदरम्यान सोशल मीडिया जास्त वापरात आल्याने लोकांना मनोरंजनासाठी भरपूर वेळही मिळाला. म्हणूनच समाजातील झालेल्या या बदलांचा विचार लक्षात घेऊन मनोरंजनात्मक आणि विनोदी भावना असलेल्या वाक्यांचा वापर करून निखील खोत व अभिषेक माने या युवकांनी हे जनजागृती कॅम्पेन बनवले आहे.
- चौकट
डिझाईन, चिन्हांचा वापर
निखील खोत व अभिषेक माने यांनी जनजागृतीसाठी छायाचित्रे व वाक्यांचा वापर केला आहे. तसेच ती छायाचित्रे ज्याठिकाणी काढली गेली, त्याचठिकाणी त्याचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे तो आपल्या आसपास असल्याची जाणीव निर्माण करून सतर्क राहण्यास भाग पाडतो. कोणतीही सूचनात्मक भावना न देता फक्त डिझाईन्स व चिन्हांद्वारे सतर्क राहण्याची भावना निर्माण करणे, हे या फलकांचे उद्दिष्ट आहे.
- चौकट
जनजागृतीचा त्रिवेणी संगम
जनजागृतीच्या या अनोख्या कल्पनेतून युवकांनी मनोरंजनात्मक पद्धतीने केलेली वाक्ये, त्याठिकाणची छायाचित्रे, त्याला योग्य त्या डिझाईनची जोड याचा सुरेख त्रिवेणी संगम साधून समाजाशी संवाद साधला आहे. या सर्वाचा एक रास्त परिणाम फलक पाहणाऱ्यांचा मनात नकळत होत जातो आणि पाहणारा सावध होतो.
फोटो : १९ केआरडी ०१
कॅप्शन : कऱ्हाडात निखील खोत व अभिषेक माने या युवकांनी जनजागृतीवर बनविलेल्या चित्रांचे फलक उभारण्यात आले आहेत.