शिरवळ : शिरवळ येथील सूर्यकांत भांडे-पाटील व कुटुंबीयांनी संकराँक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत अनोखा विक्रम नोंदवला आहे.मुंबई येथील अरबी समुद्रातील संकराँक लाईट हाऊस ते गेट वे आॅफ इंडिया ५७ व्या सागरी जलतरण स्पर्धेत शिरवळ येथील जलतरणपटू सूर्यकांत भांडे-पाटील (वय ५३ वर्षे), त्यांची पत्नी प्रतिभा (५३ वर्षे) व त्यांचा मुलगा सौरभ (वय २६ वर्षे) असे तिघांनी आपला सहभाग नोंदवून आपापल्या गटामध्ये विक्रमी वेळेत पोहून स्पर्धेमध्ये यश मिळविले. तसेच आई-वडील आणि मुलगा असे सहभागी होण्याचा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे सौरभ भांडे-पाटील हा शिक्षणासोबतच व्यवसायात देखील लक्ष देत असल्यामुळे वेळेअभावी कसलाही सराव नसताना देखील त्याच्या गटामध्ये विक्रमी वेळ नोंदवून आश्चर्याचा धक्काच दिला आहे. प्रतिभा भांडे-पाटील यांनी स्पर्धेच्या शेवटी पाण्याच्या उलट्या प्रवाहाबरोबर तर अक्षरश: १५ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली आहे. सूर्यकांत भांडे-पाटील यांना स्पर्धेतून जय किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर संघर्षमय जीवनातून नव्या पिढीला आणि सर्व समाजाला एक कृतीयुक्त प्रबोधन करण्याचा त्यांचा मनोदय होता. योगायोगाने १५ वर्षांपूर्वी दि. २४ फेब्रुवारी २००४ रोजी सूर्यकांत आणि त्यांचा मुलगा सौरभ भांडे-पाटील या दोघांनी याच समुद्रात ३६ किलोमीटर एकत्र एकाच वेगाने विक्रमी वेळेत पोहून जगातील पहिले पिता-पुत्र होण्याचा पहिला विश्वविक्रम करून सुरुवात केली होती.