सातारा : सातारा तालुक्यातील खावली गावाजवळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होणार आहे. क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. येथील सुमारे शंभर एकर जागेची पाहणीही बुधवारी करण्यात आली.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात या कामाच्या अनुषंगाने बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपकेंद्राच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा झाली. क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या मालकीची सुमारे ७१ हेक्टर जागा उपलब्ध आहे. यापैकी १०० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. ही जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेचा ठराव होणे आवश्यक आहे. जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून ठराव झाल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.या चर्चेनंतर खासदार उदयनराजे भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, रजिस्ट्रार डॉ. विलास नांदवडेकर, अॅकॅडमिक अॅडव्हायझर डॉ. डी. आर. मोरे यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य अॅड. डी. जी. बनकर, अमित कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ‘साविआ’चे कार्याध्यक्ष शिरीष चिटणीस, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती मनोज शेंडे, जावळीचे अमित कदम आदींनी क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची पाहणी केली.दरम्यान, खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे, जिल्हाधिकाºयांसमवेत डॉ. देवानंद शिंदे यांच्याबरोबर संयुक्त बैठक झाली. या बैठकीत खावली येथील जागाही निश्चित करण्यात येऊन जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहेत. १९६२ पासून महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संबंध हा शिवाजी विद्यापीठाशी येत असतो. त्यामुळे विद्यापीठाशी कोणत्याही कारणाने संपर्क साधण्याचा झाल्यास त्यासाठी कोल्हापूर येथे जावे लागते.कौटुंबिक परिस्थिती बेताची असलेल्यांना कोल्हापूर येथे जाण्याचा आणखीनच जास्त उपद्व्याप सहन करावा लागतो. यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. येत्या सहा महिन्यांत बांधकामाचा प्रारंभ करण्यात येईल. हे उपकेंद्र सुरू झाल्यावर कालांतराने सोलापूर विद्यापीठासारखे सातारा विद्यापीठ स्वतंत्रपणे निर्माण केले जाईल, असे स्पष्ट केले.वैद्यकीय महाविद्यालयाचा अडथळा दूरविद्यापीठ उपकेंद्राच्या निर्मितीसाठी खावलीजवळील या जागेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला होता; परंतु त्यावेळी ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित केली असल्याने जिल्हा परिषदेने ठराव नामंजूर केला होता. आता वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृष्णा खोरे महामंडळाची जागा निश्चित झाल्याने विद्यापीठ उपकेंद्र उभारणीत अडथळा राहिलेला नाही.
खावलीजवळ विद्यापीठ उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 10:55 PM