सांगली - शिवसेनेला दुतोंडी गांडुळ म्हणालो म्हणून त्यांनी मला विषारी सापाची उपमा दिली. शिवसेनेने त्यांनी मळमळ बाहेर काढली. कोण काय आहे आणि कोणाच्या पाठीशी रहायचे, हे आता जनतेला ठरवू द्या. शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा इतकी झोंबली, की त्यांच्या पोटातील सगळं बाहेर पडलं. आता त्यांचं खरं, की माझं, याचा निर्णय जनताच घेईल, असंही अजित पवार म्हणाले. सामना दैनिकातून शिवसेना जरी मळमळ व्यक्त करत असली, तरी, शिवसेनेचीच भूमिका दुटप्पी आहे. मेस्मा लावताना, त्याला तुमच्या मंत्र्यांची मूक संमती होती का, तुम्ही डरपोक आहात? एसटीच्या खासगीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध आहे.
राज्यातील खोटारड्या सरकारने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अजून शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला नाही. संभाजी निलंगेकर यांना ७८ कोटीच्या कर्जाला ५३ कोटींची माफी दिली, मात्र शेतकऱ्यांना कर्जातून मुुक्ती दिली जात नाही, असा टोमणाही यावेळी त्यांनी मारला.सर्वच क्षेत्रात बेरोजगारांना एकीकडे रोजगाराचे केवळ आश्वासन दिले जात आहे, मात्र दुसरीकडे, शासकीय नोकऱ्यांमधील रिक्त पदे रद्द करण्याचा डाव सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.या दौऱ्यात सहभागी असलेल्या सुनील तटकरे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, धर्मांध सरकारपासून मुक्ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देऊ शकते, हा जनतेला विश्वास आहे. सांगलीत विद्यमान खासदारांची गुंडगिरी सुरू आहे. त्याविरोधात रोष बघायला मिळतोय. सिंचन घोटाळ्यासंदर्भात, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे यावर जास्त वक्तव्य करणार नाही. मात्र पूर्वीपासून आम्ही चौकशीला सहकार्य करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत. या चौकशीतून लवकरात लवकर सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा आहे, असे मत सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवसेना म्हणजे ढेपेला चिकटलेला मुंगळापवार म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांनी राज्यसभेचे उपसभापतीपद कोणाला द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यातही विधानसभेच्या उपाध्यक्षांची जागा तीन वर्षांपासून रिक्त आहे. हे पद कोणाला द्यायचे, यात सत्ताधाऱ्यांचे एकमत झालेले नाही. शिवसेनेला दिले तरी आश्चर्य वाटणार नाही. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटतो तशी शिवसेनेची अवस्था आहे.