खटाव : राज्य शासनाने राज्यातील नागरिक कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहावा, यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी मागील एक महिनाभर घरामध्येच राहून शासनाला सहकार्य करत होता. मात्र, कृषी क्षेत्राला काही नियम व अटींवर शासनाने शेतीची कामे आणि शेतीपूरक उद्योग सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
खटावमध्ये शेती मशागतीला आता वेग आला आहे. कोरोनाचे संकट असले तरी शेतकऱ्यांनी त्याला बाजूला ठेवून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. परंतु, वादळानंतर कधी ऊन, कधी पाऊस या वातावरणामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत असला, तरी दरवर्षीप्रमाणे बी-बियाणे खरेदी करताना मात्र त्याचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती त्याला आहे. म्हणूनच बहुतांश शेतकरी घरगुती म्हणजेच यापूर्वी शेतात पिकवलेल्या बियाण्याचा वापर करण्यास पसंती देत आहेत.
अवघ्या महिनाभरात खरिपाची पेरणी करण्याची लगबग सुरू होईल. त्यामुळे आता शेतकरी पेरणीपूर्व मशागतीमध्ये व्यस्त झाला आहे. मागील वर्षापासून नैसर्गिक आपत्तीबरोबरच कोरोनाशी झुंज देत असलेला शेतकरी एक नव्या उमेदीने शेतीकामात व्यस्त झाला आहे.
लॉकडाऊन संपेल की वाढेल, अशा संकटाशी झुंज देत शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीचे नियोजन करत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. गेल्यावर्षीपासून कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेच, त्याचबरोबर आर्थिक घडीही विस्कटली आहे. अशातच शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याला या आर्थिक परिस्थितीशी सामना करत असताना, शेती मशागतीची कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन असले, तरी तोंडावर येत असलेल्या खरीप हंगामासाठी कोरोनाला दूर ठेवत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात स्वतः आणि सोबत मजुरांना घेऊन शेतामधील तण, काडीकचरा वेचणे, शेणखत टाकणे, फन पाळी मारणे, या कामांमध्ये सामाजिक अंतर ठेवून व कोरोनाचे नियम पाळून शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
कॅप्शन :
खटाव परिसरातील शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. (छाया : नम्रता भोसले)