कोरेगाव : कोरेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शीला श्रीमंत झांजुर्णे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गेली दहा दिवस उपसभापती संजय साळुंखे यांच्याकडे प्रभारी पदभार होता.राजीनाम्यामुळे झालेल्या रिक्त जागी निवड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मंगळवारी सकाळी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत शीला झांजुर्णे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
पाटील-नाईकडे व गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. मावळते सभापती राजाभाऊ जगदाळे व उपसभापती संजय साळुंखे यांनी त्यांना सभापती पदावर स्थानापन्न केले. यावेळी पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.सभापतीपदाची निवड जाहीर झाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. झांजुर्णे यांची सभापतीपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळून त्यांची जोरदार मिरवणूक काढली.तडवळे संमत कोरेगावाला पहिल्यांदाच मान कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया जागृत असलेल्या तडवळे संमत कोरेगाव गावाला पहिल्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष श्रीमंत दादा झांजुर्णे यांच्या शीला झांजुर्णे या पत्नी आहेत.