सातारा : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला असून, त्यांची हत्या झाली असल्याची धक्कादायक माहिती एक वर्षानंतर समोर आली आहे. जवान प्रथमेशवर जम्मू येथे त्यांच्याच सहकाऱ्याने एके ४७ रायफलमधून गोळीबार केला. याप्रकरणी संबंधित जवानाला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वीर जवान प्रथमेश पवार हे दि. २० मे २०२२ रोजी जम्मूतील मिल्ट्री कॅम्पमध्ये गोळी लागून शहीद झाल्याचे पवार कुटुंबाला सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यांचा घातपात झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जम्मू- काश्मीर पोलिस दलाकडे सोपविण्यात आला होता. तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर वीर जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. प्रथमेश ज्या कॅम्पमध्ये ड्यूटीवर होते त्याच कॅम्पमधील वैद्य खुशरंग या जवानाने त्यांच्यावर एके ४७ या रायफलमधून गोळीबार करून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर जम्मू पोलिसांनी खुशरंगला अटक केली. नेमकी कोणत्या कारणातून प्रथमेशची हत्या करण्यात आली, हे मात्र अद्याप समोर आले नाही.
Satara News: जावळीतील जवानाची जम्मूत हत्या, एक वर्षानंतर झाला उलगडा; संबंधित जवानाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 6:29 PM