पेरूची विक्री वाढली
कऱ्हाड : शहरात ठिकठिकाणी शेतकरी पेरूची विक्री करताना दिसून येत आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या पेरू पक्व होण्यास सुरुवात झाली असून, पेरूला मागणीही वाढली आहे. चाळीस ते पन्नास रुपये किलो दराने त्याची विक्री केली जात असून, गुजर हॉस्पिटलसह हेड पोस्टानजीक त्याची विक्री होत आहे.
संरक्षक रेलिंगवर वेली
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण मार्गावर वारुंजी फाट्यापासून विजयनगरपर्यंत दुभाजक उभारण्यात आले आहेत. या दुभाजकात संरक्षक रेलिंग बसविण्यात आले असून, सध्या या रेलिंगला वेलींनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे. लोखंडी रेलिंगवर वेली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्याचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. वेली हटविण्याची मागणी होत आहे.
वाहतूक रोखली
कऱ्हाड : शहरातील कोल्हापूर नाका ते शाहू चौक मार्गावर पोपटभाई पेट्रोल पंप चौकात पोलिसांनी बॅरिकेटस् लावले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पोपटभाई पेट्रोल पंप चौक ते भेदा चौकमार्गे होत असून, एकाच रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. पेट्रोल पंप चौकातील बॅरिकेटस् हटवून वाहतूक सुखकर करावी, अशी मागणी होत आहे.