सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस कमी झाला असलातरी सध्या अवकाळीचे ढग दाटून आले आहेत. साताऱ्याबरोबरच माण तालुक्यातही आज,बुधवारी पहाटेपासून पाऊस पडला. याचा फायदा ज्वारीला झाला असलातरी पीक काढणीवर परिणाम झालेला आहे. तर अवकाळी पावसामुळे फळबागधारक शेतकऱ्यांत चिंता निर्माण झालेली आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन पीक हंगाम घेण्यात येतात. हे दोन्हीही हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे यंदा २ लाख हेक्टरवर आहे. या दोन्हीही हंगामासाठी मान्सूनचा पाऊस महत्वाचा ठरतो. पण, यंदा मान्सूनने दगा दिला. सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला तर आता रबीची पेरणी सुरू आहे. अनेक भागात ज्वारीची पेरणी झालेली आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच दुसरीकडे चिंताही लागून राहिलेली आहे.सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. असे असतानाच आज, सकाळच्या सुमारास माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरात अवकाळी पाऊस झाला. जवळपास एक तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फायदा उगवण झालेल्या ज्वारीला होणार आहे. त्यामुळे भांगलण होऊनच पुढील पाणी देण्याची गरज भासणार आहे. तर काही भागात अजुनही सोयाबीन, बाजरी पीक काढणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. यावर या पावसाचा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर रबी हंगामातील पेरणीवर परिणाम होणार आहे. काही दिवस पेरणी खोळंबणार आहे.दरम्यान, या अवकाळी पावसाचा उगवून आलेल्या पिकाला फायदा होणार आहे. पण, फळबागधारक शेतकऱ्यांत चिंता आहे. कारण, द्राक्ष, डाळिंब बागांवर पावसाचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना रासायनिक आैषध फवारणी करावी लागणार आहे. तसेच फळधारणेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
साताऱ्यात जोरदार हजेरी..सातारा शहरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालेले. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. तर सकाळी ११ च्या सुमारास भूरभूर पाऊस पडत होता. मात्र, साडे आकराच्या सुमारास पावसाची जोरदार सर पडली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांना निवारा शोधावा लागला. तर रस्त्याच्या बाजुला बसणाऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली.