जिरायती विभागातील शेतकरी वर्षातून खरीप आणि रब्बीची पिके घेतात. त्यावरच त्याचे आर्थिक बजेट अवलंबून असते. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने उत्पादन घटले. त्यातून शेतकरी सावरत असतानाच चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने शाळू पिकाला भुईसपाट करून टाकले. ऐन पोटऱ्यात आलेले पीक या पावसाने हिरावून घेतले.
शाळू आणि त्याचा कडबा यावर जिरायती विभातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. कऱ्हाड उत्तरमधील काही गावातील शेतकऱ्यांच्या शाळू पिकांचे अवेळी आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. एका वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान हे न सोसणारे असल्याने काय करावे, अशा विचारात शेतकरी आहेत. सोयाबीन पिकांचे पंचनामे केले. त्याचा लाभ मिळाला नसतानाच हातातोंडाशी आलेला शाळू पिकाचा घास पावसाने काढून घेतला. जमीन पाडून ठेवायची नाही म्हणूनच शेतकरी कसतोय, अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
- कोट
खरिपातील सोयाबीन अतिवृष्टीने गेले, तर जोमदार आलेले शाळू पीक अवेळी आलेल्या पावसाने भुईसपाट केले. शेती करावी की नको, अशी आमची अवस्था झाली आहे. माझे तीस गुंठे क्षेत्रावरील शाळू पीक भुईसपाट झाले आहे.
- पांडुरंग पोळ
शेतकरी, शामगाव
- चौकट
उत्पादन घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत
सध्या शाळू पिकाला पोटरे पडले आहेत. मध्यंतरी थंडीचा प्रादुर्भाव वाढला होता. ही थंडी शाळू पिकाला पोषक असते. मात्र, थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. त्यातच काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस कोसळला. सध्याही ढगाळ वातावरण असून, अधूनमधून धुके पडत असल्याने कणसाला शाळूच्या जाळी होण्याचा धोका आहे. असे झाल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, शेतकरी चिंतेत आहेत.
फोटो : ०८केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड उत्तर विभागात काही क्षेत्रावरील शाळू पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे. (छाया : शंकर पोळ)