सातारा : जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाचा दणका सुरू झाला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
कोपर्डे हवेली परिसरात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, ज्वारी पिकास हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. विजेच्या गडगडाटासह अवेळी आलेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्याचा पाऊस हा गहू पिकासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत जमिनीला घात नसल्याने ऊसतोड बंद होती. पाऊस जोराचा असल्याने भाजीपाला पिकाची फूलकळी गळाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फलटण तालुक्यातील सुरवडी, निंभोरे, ढवळेवाडी परिसरात चार वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी व कामगार यांच्या मनात धडकी भरली होती. यावर्षी हंगामात गहू, ज्वारी, मका, कडवळ पिकांची चांगली उगवण झाली आहे. गहू पीक पुढील काही दिवसात काढणीस येणार आहे. त्यामुळे भरून आलेल्या आभाळाने शेतकऱ्यांना चांगलीच धडकी भरवली होती.
फोटो
१८मलकापूर-शुगरकेन
मलकापूर परिसरात बुधवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (छाया : माणिक डोंगरे)