सातारा : फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ३७५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर यामध्ये २ हजार १९६ शेतकरी बाधित झाले आहेत. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्याचबरोबर पावसासह मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या होत्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले होते. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. अवकाळीतील नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ३७५.५० हेक्टरवरील पिके आणि बागांना फटका बसल्याचे दिसून आले.
अवकाळीचा फटका खटाव तालुक्यात अधिक करून बसला आहे. या तालुक्यात मोठमोठ्या गारा पडून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३३७ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे, तर फळबागाखालील बाधित क्षेत्र ३० हेक्टर आहे. या तालुक्यातील १ हजार ८७९ शेतकऱ्यांना अवकाळीमुळे नुकसान सोसावे लागले आहे.
खटावनंतर वाई तालुक्यात अधिक नुकसान झाले आहे. वाईतील २६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला, तर २७६ शेतकरी बाधित झाले आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील ३ आणि महाबळेश्वरमधील २ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. इतर तालुक्यांत अवकाळीमुळे नुकसान झाले नसल्याचे पंचनाम्यावरून समोर आले आहे. दरम्यान, अवकाळी पावसात ज्वारी, गहू, हरभरा, मक्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.
चौकट :
भरपाई लवकर देण्याची गरज...
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यामधील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. यामधून सावरत असतानाच फेब्रुवारीतील अवकाळी पावसाचा दोन हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पीक नुकसानीचे पैसे लवकर मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
.......................................................