पिकांना फटका
शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रसह परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला. गहू, हरभरा, ज्वारी ही पिके वादळीवारा व पावसामुळे भुईसपाट झाली आहे. हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या आठ दिवसांत तालुक्यात तीन वेळा पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीदेखील आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी व्यापून गेले होते. मात्र, पाऊस झाला नाही.
संरक्षक कठडे गायब
सातारा : मेढा-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे कठडे पूर्णपणे ढासळले असून, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. पावसामुळे या घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. हा धोका असतानाच आता संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाची कठड्यांची तातडीने डागडुजी करून धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक लावणे गरजेचे बनले आहे.
मोळाचा ओढा
रस्त्याची दुरवस्था
सातारा : शहरातील प्रमुख रस्त्यांची पालिकेकडून डागडुजी करण्यात आली असली तरी कोटेश्वर मंदिर ते मोळाचा ओढा या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना या मार्गावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिका व बांधकाम विभागाने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले; परंतु शहराला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेले नाही. रस्त्याची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.