सातारा : भारतातील सर्वाधिक कठीण समजली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेत सातारा जिल्ह्यातील श्रीकांत कुलकर्णी, तुषार देसाई आणि ओमकार पवार यांनी यश संपादन केले. सामान्य कुटुंबातील मुलांच्या या असामान्य कामगिरीने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यूपीएससीने जानेवारीत मुख्य परीक्षा घेतली होती. त्यानंतरच्या मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे लांबला. या मुलाखतीची प्रक्रिया बुधवार दि. २२ रोजी पार पडली. त्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत देशभरातून ७६१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५ तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे. चिकाटी, सहनशीलता आणि संयमाच्या जोरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चिज या परीक्षांमुळे झाले.
चौकट :
१. श्रीकांत कुलकर्णी, कार्वेनाका कऱ्हाड
कऱ्हाड येथील कार्वे नाक्यावर राहणाऱ्या श्रीकांत कुलकर्णी यांचे वडील माधव कुलकर्णी कोयना दूध संघात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्याची आई आरती गृहिणी आहे. मोठा भाऊ प्रसाद त्याच्या पत्नीसह अमेरिकेत कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून श्रीकांत कोल्हापूर येथे प्रवर्तन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचे शालेय शिक्षण होली फॅमिली स्कूल येथे तर पुढील शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि पुण्यात झाले. त्याने इतिहास विषयात एमए करून तो नेटही उत्तीर्ण झाला आहे.
२. तुषार देसाई, आणे ता. कऱ्हाड
आणे ता. कऱ्हाड येथील तुषार देसाई याचे वडिल उत्तम देसाई बांधकाम विभागाचे उपअभियंता आहेत. त्यांची आई रंजना गृहिणी आहे. तुषार यांचे माध्यमिक शिक्षण कºहाडच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. स्कॉलरशिपमध्ये ते राज्यात प्रथम आले होते. २०१५ मध्ये सीओईपीमधून बी. टेक. मेकॅनिकल ही पदवी प्राप्ती केली. २०१८ पासून भोपाळ येथे नाबार्डमध्ये ते अधिकारीपदी कार्यरत आहेत. तुषार यांनी ऑल इंडियात २२४ वा क्रमांक पटकावला.
३. ओंकार पवार, सनपाने, ता. जावली
जावली तालुक्यातील ओंकार सानपाने यांचे वडील मधुकर पवार हे करहर येथे छायाचित्रकार आहेत. त्याची आई ... गृहिणी आहे. त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल हुमगाव येथे झाले आहे. ग्रामीण भागात राहत असल्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही, हे ओळखून त्याने स्पर्धा परीक्षेची निवड केली. कुटुंबाने दिलेल्या मानसिक बळाच्या ताकदीनेच हे यश मिळविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
...............