लोणंद : नगरपंचायतीच्या सभेत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी केलेली शिवीगाळ व राष्ट्रगीताच्या अवमानाबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच लोणंदचं राजकारण तापायला लागलं. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या. याप्रकरणी उपनगराध्यक्ष शेळके यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी उपोषण केले.
लोणंद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नगरपंचायतीच्या पोर्चमध्ये सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) लोणंद शाखेच्या वतीने उपोषण सुरू केले. यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शाखाप्रमुख भूषण खरात यांनी म्हटले आहे की, लोणंदच्या इतिहासात अशी प्रथम घटना घडली आहे. राष्ट्रगीताचा अवमान करणारे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोणंदची जनता चुकीचे घडू देणार नाही. राष्ट्रगीताचा अवमान करणाºयांना धडा शिकवला जाईल.यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) लोणंद शाखेच्या वतीने सकाळी नगरपंचायत ठिकाणी सह्यांची मोहीम आणि लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी ‘उपनगराध्यक्षांचा निषेध असो, कारवाई झालीच पाहिजे,’ अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी हमाल पंचायत जनरल कामगार संघटना व नगरपंचायत कर्मचारी संघटना लोणंद तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान खंडाळा तालुका, जीवनआनंद लघुव्यावसायिक खोकेधारक संघटना लोणंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोणंद या संघटनांनी लाक्षणिक उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच नगरपंचायत विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, बाळासाहेब शेळके, म्हस्कुअण्णा शेळके, हर्षवर्धन शेळके, भूषण खरात, उमेश खरात, स्वप्नील खरात, रवींद्र खरात, अजिंक्य खरात, प्रमोद रणदिवे, तारीख बागवान, मित्तल शहा, शरद भंडलकर, सागर खरात उपस्थित होते.क्लीपला उत्तर क्लीपनेउपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबतची चित्रफीत दोन दिवस सोशल मीडियावर फिरत होती. त्याला उत्तर देण्यासाठी उपनगराध्यक्ष शेळके यांच्या समर्थकांनी सभेतील शेवटच्या भागाची संपूर्ण चित्रफीत सोशल मीडियावरून टाकून सोमवारी उत्तर दिले आहे. यामध्ये नगरसेवक किरण पवार, कुसुम शिरतोडे हे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी व अधीक्षक शंकर शेळके यांना ‘सभा संपलेली नाही, राष्ट्रगीत चालू करू नका’ असे सांगत असल्याचे दिसत आहे.