सातारा : सातारा बाजार समितीसाठी मतदान शांततेत सुरू असतान त्याठिकाणी सातारा बाजार समितीमध्ये कार्यरत असणारे दोन कर्मचारी दिसून आल्यानंतर स्वाभिमानीने तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्याकडे अधिकृत परवानगी पत्र आहे काय असा जाब विचारला. यामुळे यामुळे त्याठिकाणी तणावाची परिस्थिती झाली. यानंतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या बाहेर काढण्यात आले.
याबाबत माहिती अशी, बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी सकाळी सात वाजता सुरू झाली. सातारा येथील आयटीआय कॉलेजमध्ये मतदान शांततेत सुरू असताना त्याठिकाणी साडेअकरा वाजता बाजार समितीचे दोन कर्मचारी असल्यावरून स्वाभिमानीने जोरदार आक्षेप घेतला. यासंदर्भात माजी संचालक व खासदार गटाचे काका धुमाळ यांनी दोन कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकृत पत्र नसताना पिवळे कार्ड लावून कसे काय केंद्रात आला असा जाब विचारला व मतदारांना फूस लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
त्यावर आम्ही कोणत्याही मतदाराला काहीही सांगितले नसल्याचे दोन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना केंद्राबाहेर नेले. यानंतर पत्रकारांशी बोलताना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी अगोदर पदाचा राजीनामा द्यावा आणि मग हवा त्याचा प्रचार करावा, याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रितसर तक्रार करण्यात येणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.