कुडाळ - जावळी तालुक्यातील सनपाने गावच्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील ओमकार पवार याने, सामान्य परिस्थितीतून २०२१-२२मध्ये झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत १९४ वा क्रमांक मिळवला आहे. त्याल जावळीतील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या गगनभरारीचे भरभरून कौतुक होत असून, जावळीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला आहे.
जावळी म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा भूभाग असून, याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे. येथील माणसे गरीब, कष्टाळू व या मातीला गुणवत्तेचा सुवास आहे. याच तालुक्यातील सनपाने येथील ओमकार पवार याने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ओमकार हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील. त्याचे वडील मधुकर हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात आणि आई नीलिमा या शेतीकाम करतात. घरात तीन भावंडे, दोन बहिणी व ओमकार. ओमकारचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या सनपाने शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, हुमगाव आणि कऱ्हाड येथे झाले. तर पुणे येथे त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीत चांगल्या नोकरीचा स्वीकार न करता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात सातत्य ठेवले. यामध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘असिस्टंट कमांडर इन पॅरामिलिटरी फोर्स’ या पदासाठी निवड झाली. यानंतरही त्यांनी आपला अभ्यास नियमित सुरूच ठेवला होता. नुकताच तीन महिन्यांपूर्वी तो आयपीएस म्हणून हैद्राबाद याठिकाणी रुजू झाला होता. मात्र, आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. यामुळे त्याच्यातील जिद्द, आकांशा त्याला यासाठी शांत बसू देत नव्हती. याकरिता खचून न जाता चिकाटी आणि कष्टाने, त्याच्या अथक परिश्रमाने त्याने आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले. ओमकारच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील, गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सारथी संस्थेच्या माध्यमातूनही त्याला मोलाची मदत झाली.
ग्रामीण भागातील मुलांमध्येही चांगली गुणवत्ता आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला हवी. हे करत असताना अपयश पचविण्याची ताकत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्याकडे असायला हवी. आज ग्रामीण भागातही मार्गदर्शन होत आहे. युवा पिढीने आपली मानसिकता बदलून स्वतःला स्पर्धा परीक्षेत सिद्ध करण्यासाठी मेहनत करायला हवी. या मुलांना निश्चितच माझ्याकडून मार्गदर्शन होईल, असे ओमकार पवार यांनी म्हटले आहे.