मुराद पटेल। लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : माळरानावरील कातकरी कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना बोटाला धरून शाळेपर्यंत आणणे अन् त्यांना ग-म-भ-न शिकवून त्यांच्या झोपडून ज्ञानाचा दिवा तेवत ठेवण्याची किमया ‘उर्मी’मुळं शक्य झाली. शिक्षणापासून वंचित कातकरी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जादू शिक्षिका स्वाती गोसावी यांनी करून दाखविली आहे. माळरानावर कातकरी समाजाची वस्ती आहे. तेथील असंख्य मुलं शाळेत जात नाहीत. तेथील लोक कायम मासेमारी, वीटभट्टीवर कमी पगारावर काम करतात. पिढ्यान्पिढ्यांचे दारिद्र्य झटकण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी इतर समाजातील लोकांनीही याकडे कधी लक्ष देण्याची गरज दर्शविली नाही. सर्व शिक्षा अभियान असो किंवा इतर कोणत्याही योजना यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. ‘उर्मी’ संस्थेच्या माध्यमातून शिक्षिका स्वाती गोसावी यांनी हीच गरज ओळखून माळरानावर वसलेल्या कातकरी समाजाच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ‘उमेद खेळघर’ ही संकल्पना राबविली. आठवड्यातून सहा दिवस दररोज दोन-तीन तास खेळांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. तसेच मुलांच्या पालकांना शिक्षणाबाबत महत्त्व पटवून देत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. वस्तीवरील ४३ मुला-मुलींपैकी नऊ मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणत शिरवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत दाखल केले. तसेच पंधरा मुलांना वस्तीवरच शाळेची सोय केली. त्यांना शैक्षणिक साहित्य समाजातील दानशूरांकडून मिळवून दिले. त्यामुळे नऊ मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य झाल्याचे स्वाती गोसावी यांनी सांगितले.
‘उर्मी’मुळं ४३ शाळाबाह्य मुलं शिकू लागली ‘ग म भ न’
By admin | Published: July 10, 2017 11:21 PM