पुसेसावळी : उरमोडी योजनेचे थकित वीजबिल हे माण तालुक्यात टंचाई काळात नेलेल्या पाण्याचे वीजबिल आहे. खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा या वीजबिलाशी कोणताच संबंध नाही. याउलट ‘ग्रीन पॉवर शुगर’ने वीजबिलापोटी सुमारे एक कोटी रक्कम भरलेली आहे. असे असताना वीज कनेक्शन बंद करून पाण्यासाठी चालवलेली अडवणूक ही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा नमुना आहे. माणला नेलेल्या पाण्याचे वीजबिल खटावच्या माथी मारू नका, अशा भावना आंदोलनर्त्यांनी व्यक्त केल्या. उरमोडीचे थकित वीजबिल शासनाने भरावे, या मागणीसाठी पुसेसावळी येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढली असून, शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनास पाठिंबा देत आहेत.मंगळवारी आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पृथ्वीराज देशमुख, धैर्यशील कदम, जितेंद्र्र पवार, विक्रम पावसकर, नूतन जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सर्वगोड, सागर शिवदास यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच पाणी आवर्तन तातडीने सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. सुमारे तीन कोटी रुपये वीजबिलाचा खटावच्या शेतकऱ्यांशी काडीमात्र संबंध नाही. ही थकबाकी शासनाने भरावी व पाणी आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)उद्या रास्ता रोको पालकमंत्री विजय शिवतारे व सहपालकमंत्री सदाशिव खोत यांनी निर्देश देऊनही वीज मंडळाकडून पाणी योजनेची वीज जोडणी होत नाही. पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या आदेश न जुमानणाऱ्या वीज मंडळाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ८) दुपारी पुसेसावळी येथे रास्ता रोको व वीज कार्यालयात तोडफोड करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
उरमोडीच्या पाण्याचे बिल खटावच्या माथी नको
By admin | Published: March 07, 2017 10:25 PM