ओगलेवाडी : दुभाजक हा रस्ता विलग करण्यासाठी असतो. मात्र, ग्रामीण भागात याचा वापर हा सोईनुसार केला जातोय. गॅस महाग झाला असल्याने लोक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. चुलीला जळण म्हणून शेण्याचा वापर हा केला जातो. शेण्या लावण्यासाठी जागा उपलब्घ नसल्यामुळे लोकांनी दुभाजकातील जागेचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे गावोगावी दुभाजकामध्ये शेण्या लावल्याचे पाहायला मिळत आहे.
कऱ्हाडला जोडणारे सर्व रस्ते हे चौपदरी झाले आहेत. ढेबेवाडी, पाटण, कडेगाव, शेणोलीकडे जाणारे रस्तेही चौपदरी झाले आहेत. या रस्त्याला मार्गिका विलग करण्यासाठी दुभाजक तयार केले आहेत. या दुभाजकात वृक्ष लागवड करून सुशोभीकरण केले आहे. मात्र, सध्या हे दुभाजक इतर कारणासाठी वापरले जात आहेत.
इंधन महाग झाले आहे. ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. लोक आता पारंपरिक इंधनाकडे वळले आहेत. जळावू लाकूड खूप महाग झाले आहे. म्हणून लोक शेण्या वापरू लागले आहेत. या शेण्या लावण्यासाठी आवश्यक जागा आता वाढत्या शहरीकरणामुळे कमी पडत आहे. या जागेच्या समस्येवर आता लोकांनी उपाय शोधून काढला आहे. दुभाजकातील जागा त्यासाठी वापरायला सुरुवात झाली आहे. गावजवळ आले आणि दुभाजकाचे निरीक्षण केले की, जागोजागी यामध्ये शेण्या लावल्या पाहायला मिळते. वाळून तयार झालेल्या शेण्या रचून ठेवण्यासाठी ही या जागेचा वापर केला जात आहे. दुभाजकात बसून शेण्या लावताना धोका कमी आहे. मात्र, ज्या ठिकाणी दुभाजक उंच आहेत, तेथे महिला रस्त्याकडेला उभ्या राहून शेण्या लावण्याचे काम करीत असतात.
चौकट
हे धोकादायक आहे.
या रस्त्यावरील वाहनाचा वेग हा खूप जास्त असल्याने अपघात होण्याचा धोका आहे.
मात्र, जागेची कमतरता आणि इंधनाचे वाढते दर ग्रामीण महिलांना हा धोका पत्करायला भाग पाडत आहे, तरीही मार्गिका विलगीकरण, वृक्षारोपण याबरोबरच दुभाजक हे गरिबांच्या शेण्याचे रक्षण ही करीत असल्याचे दृश्य ही गावोगावी पाहावयाला मिळत आहे.