कोरेगाव : पुणे-मिरज लोहमार्गावर धावणाऱ्या कोल्हापूर-मिरज-पुणे पॅसेंजरमधून अनेक वर्षांपासून नागरिक प्रवास करीत आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जुन्या रेल्वे गाड्यांऐवजी नव्या डेमू रेल्वे गाड्या धावू लागल्या आहेत. ऐन थंडीत पहाटे सुटणाºया पॅसेंजरमधील प्रवाशांना विना दरवाजाच्या गाड्यांमधून कुडकुडत प्रवास करावा लागत आहे.पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या चार जिल्ह्णांतील प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त प्रवासासाठी कोल्हापूर-मिरज-पुणे पॅसेंजर उपलब्ध आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर पॅसेंजरच्या दिवसातून केवळ दोनच फेºया होतात. त्यापैकी रात्रीच्या दोन्ही बाजूच्या फेºया साताºयातच मुक्कामी असतात. त्यामुळे थेट प्रवासासाठी दिवसातून केवळ एकच पॅसेंजर आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.ही पॅसेंजर कोल्हापुरातून पहाटे पाच वाजता पॅसेंजर पुण्यासाठी सुटते. अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात ही पॅसेंजरमध्येच येत असल्याने जवळपास तिला तीन ते चार स्थानकांवर अन्य गाड्यांना क्रॉसिंग देण्यासाठी नाईलाजास्तव थांबावेच लागते. तब्बल पाच तासांनंतर ती साताºयात पोहोचते. तेथून दरमजल करत पुण्याकडे मार्गक्रमण करते. पुण्यात तिला पोहोचण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागतो. दिवसभरात पुन्हा पुण्यासाठी जाण्यास पॅसेंजर नाही, सायंकाळी ४.५० वाजता दुसरी पॅसेंजर (५१४४२) सुटते. तिला कोल्हापूर ते पुणे असे थेट तिकीट दिले जाते, मात्र ती साताºयात पहाटेपर्यंत मुक्कामी असते. पुण्यातून देखील सकाळी आणि दुपारी कोल्हापूरसाठी पॅसेंजर असून, त्यापैकी एक साताºयात मुक्कामी असते. दुसºया दिवशी दोन्ही पॅसेंजर पहाटेच्यावेळी अनुक्रमे कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने सुटतात.पॅसेंजरवर सध्या रेल्वे प्रशासनाने नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता दीड ते दोन महिन्यांपासून जुन्या डब्यांऐवजी डेमूचा वापर सुरू केल्याने प्रवासी वैतागले आहेत. थंडीत कुडकुडत डेमू रेल्वेतून प्रवास करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. प्रशासनाच्या कारभारामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली असून, एसटी व खासगी वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून जुन्या डब्यांच्या गाडीऐवजी नव्याने दाखल झालेल्या डेमू (डिसेल लोकल) या मार्गावर पॅसेंजरऐवजी चालविल्या जात आहेत. तीन गाड्या पॅसेंजरसाठी वापरल्या जातात, एक डेमू स्वयंचलित इंजिनाद्वारे चालते तर दुसºया डेमूला स्वतंत्र इंजीन जोडावे लागत आहे. जुन्या डब्यांमध्ये सुमारे १५०० प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकत होते, मात्र डेमूमध्ये ही संख्या निम्याहून कमी आहे. डेमूला दरवाजे स्वयंचलित असून हाताने ते बंद करता येत नसून आसनव्यवस्था शहरी भागाप्रमाणे आहे. त्यामुळे अनेकांना खाली बसून प्रवास करावा लागत आहे. थंडीत तर प्रवाशांना गारठत प्रवास करावा लागत आहे.चुकीची वेळेमुळे गैरसोयएका विभागात कमीत कमी दोन पॅसेंजर चालविण्याचा रेल्वे बोर्डाचा नियम असल्याने केवळ प्रशासन कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर पॅसेंजर चालवत असून, त्यात प्रवाशांच्या फायद्याचा विचार न करता, केवळ प्रशासनाच्या हिताचा निर्णय घेतला गेला असल्याचे एकंदरीत वेळापत्रक पाहिल्यावर दिसून येते. चुकीची वेळ आणि कमी अंतरासाठी जादा वेळ, हेच या मार्गावरील पॅसेंजरचे मोठे दुखणे आहे.
ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:10 PM