वाई : तापोळा भागातील अनेक दुर्गम गावातील विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करत ज्ञानग्रहण करत आहेत. त्यातील वागवले येथे रोटरी क्लब आॅफ वाईच्या वतीने आनंददायी शिक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शाळेला खेळाचे साहित्य, डिजिटल क्लासरूमचे साहित्य, पुस्तके भेट देण्यात आली.
वागवले हे गाव खूप दुर्गम भागात आहे. तेथे जाण्यासाठी तापोळा येथून तीस तास बोटीने प्रवास करावा लागतो. त्या शाळेत पाचवी ते दहावीचे शंभर विद्यार्थी शिक्षण घेतात. ते सर्व विद्यार्थी मुक्कामी शाळेत शिक्षण घेतात. वागविले भागात दळण-वळणाची सोय नसल्याने त्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेतच मुक्काम करावा लागतो. शनिवार, रविवारी ही मुले घरी जातात. घरी जाण्यासाठी काही मुलांना दोन ते तीन डोंगर ओलांडून अतिशय घनदाट जंगलातून चालत जावे लागते. खुप वाईट परिस्थितून हे विद्यार्थी शिकतात. शाळेत मुलांना पाठविण्यासाठी विशेषत: मुलींना पाठवण्यासाठी तेथील लोकांना समजावून सांगून विद्यार्थिनींचा प्रवेश घ्यावा लागतो.
रोटरी क्लबने अशा दुर्गम भागात ‘हॅपी स्कूल’चा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. यामध्ये खेळाचे साहित्य, ग्रंथालयासाठी कपाट, पाचशे पुस्तके, आणि डिजिटल क्लास रूम दिली. तसेच या भागातील मुलांचे आणि गावातील ग्रामस्थांचे रक्त तपासून त्यांना औषधे दिली.
उपक्रमाचे उदघाटन कोयना एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, खजिनदार मदन पोरे, मदनकुमार साळवेकर, दीपक बागडे, डॉ. जितेंद्र पाटक, सोनाली शिंदे, अजित पवार, निला कुलकर्णी, शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, व रोटरीयन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.