डुकरांचा सुळसुळाट
सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेत पालिकेने वराहपालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडली होती. मात्र, ही मोहीम थंडावल्याने सदर बझार, माची पेठ परिसरात डुकरांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.
दुरुस्तीची मागणी
सातारा : शहरातील अर्कशाळा ते शाहूपुरी चौक या मार्गाची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा भाग पालिका हद्दीत आल्याने आता प्रशासनाने रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
पारा १९ अंशांवर
महाबळेश्वर : जिल्ह्यात थंडीची तीव्रता हळूहळू ओसरू लागली असली तरी महाबळेश्वरच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र येथे अनुभवण्यास मिळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २५.४, तर किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : शहरातील तहसील कार्यालय परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. तहसील कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळही गाड्या लावल्या जातात. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना अनेक अडचणी निर्माण होतात. पोलिसांनी येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
सांडपाणी रस्त्यावर
सातारा : पालिकेकडून वारंवार स्वच्छता करूनही सदर बझार येथील गटारे व नाले कचऱ्याने तुडुंब भरत आहेत. गटारातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.
मोहीम सुरू करावी
सातारा : कर्कश आवाजाचा हॉर्न असलेल्या वाहनचालकांविरोधात शहरात वाहतूक शाखेकडून सुरू केलेली कारवाई वर्षभरापासून बंद आहे. या कारवाईची वाहनधारकांनी धास्ती घेतली होती. ही मोहीम बंद असल्याने नागरिकांना पुन्हा कर्कश हॉर्नचा त्रास सहन करावा लागत आहे. ही कारवाई पुन्हा सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.
दुरुस्तीची मागणी
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.