सातारा : येथील गुरुवार पेठेतील प्रकाश मंडळाने शाही मिरवणुकीद्वारे लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या शाही मिरवणुकीस दुपारी बारा वाजता शेटे चौकापासून प्रारंभ झाला. मिरवणूक पाहण्यासाठी शहरात ठिकठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती.सातारा शहरातील अनेक मंडळांनी सकाळपासूनच विसर्जनास सुरूवात केली होती. प्रकाश मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरणुकीस दुपारी प्रारंभ झाला. मिरवणूकीत रथामध्ये शंकर-पार्वती-गणेश मूर्ती ठेवण्यात आली होती. या मिरवणुकीत पुणे येथील दरबार बँण्डपथक, छत्र चामरधारी रणशिंगाचे पथक, पंच्चाहत्तर वर्षांत प्रकाश मंडळाने केलेल्या कार्याची माहिती देणारे चित्ररथ, पुढे पुणे येथील १२० मुला-मुलींचे ढोल ताशांचे एकदंत मंडळाचे पथक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेक वाहिनी, सातारा व डॉ. हमीद दाभोलकर यांच्या सहकार्याने समाज प्रबोधनासाठी पथनाट्य सादर करणारे पथक, माण तालुक्यातील पांगरी येथील धनगरी गजीनृत्य पथक सहभागी झाले होते. पुणे येथील लिंगायत महिला मंडळाचे रंगावली ग्रुपतर्फे संपूर्ण मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत होत्या. या मंडळाने चौका-चौकात घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या पाहण्यासाठी असंख्य तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. ही मिरवणूक शेटे चौकातून खालच्या रस्त्याने शनिवार चौक, मोती चौक, राजपथावरुन देवी चौक, कमानी हौद, पुन्हा शेटे चौक, मल्हार पेठ, पोलीस मुख्यालयाजवळ विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी झालेले झांजपथक, लेझीम पथक. त्यांनी केलेले रोमांचकारी खेळ, शिस्त पाहून सातारकर त्यांची वाहवा करत होते. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)प्रकाश मंडळाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त मंडळाने ७५ वर्षांमध्ये केलेल्या कामाची माहिती देणारे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मंडळाचे प्रमुख श्रीकांत शेटे, अध्यक्ष विष्णूपंत देवधर व विश्वस्त मंडळ भाविकांना संस्थेच्या कार्याची माहिती देत होते.
उंट-घोडे अन् दाभोलकरांचे प्रबोधनपर पथनाट्य
By admin | Published: September 07, 2014 10:17 PM