सातारा : माढा मतदारसंघात मोठी राजकीय कलाटणी मिळाली असून, उत्तम जानकर यांनी भाजपाला हुलकावणी देत तुतारी फुंकली आहे. याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यामुळे कट्टर विरोधक मोहिते-पाटील यांच्याबरोबरचे हे मनोमिलन असून, यातून जानकर यांचा विधानसभा निवडणुकीचा मार्गही मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आताची चाैथी निवडणूक होत आहे. पण, पहिल्या तीनपेक्षा आताची निवडणूक वेगळी आणि राजकीय घडामोडी वाढविणारी ठरली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघात तुल्यबळ लढत अटळ आहे. त्यातच सुरूवातीला माढ्याची निवडणूक भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी सोपी वाटत होती. पण, भाजपामधून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटात जाऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी मिळवली. तेथेच लढत संघर्षाची होणार, हे स्पष्ट झाले.त्याचवेळी मोहिते-पाटील यांनीही माळशिरस तालुक्यातील पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उत्तम जानकर यांनाही साद घातली. त्याला जानकर यांनीही उशिरा का असेना साद दिली आहे. आता याचा मोठा धक्का हा भाजपाला बसणार आहे.माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांची राजकीय ताकद दखलयोग्य आहे. आतापर्यंत त्यांनी मोहिते-पाटील यांच्याशी राजकीय दोन हात केले. याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली. पण याच जानकर आणि मोहिते-पाटील यांनी पाठीमागील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह यांच्यासाठी काम केले. आताच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. तसेच सोबतीला उत्तम जानकर यांनाही घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. जानकर यांनी या निवडणुकीत ‘तुतारी’ हाती घेतल्याने भाजपाच्या हाती प्रयत्न करूनही ते लागले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
विधानसभेसाठी नावाची घोषणा; राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित..माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील तसेच जयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उशिरा हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द दिला. त्यामुळे जानकर आणि मोहिते-पाटील यांचे मनोमिलन झाल्याचे समोर आले. आता जानकर यांचे विधानसभा निवडणुकीतील संकटही दूर झाले. तसेच यातून त्यांना अपेक्षा होती तेच मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे.