सातारा, दि. २९ : महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कांदाटी खोºयात जनावरांसाठी वैरण कापताना गव्याने एका युवकाला जोरदार धडक दिली. या धडकेत रमेश धोंडिबा ढेबे (वय २३, रा. पर्वत, ता. महाबळेश्वर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांदाटी खोºयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शनिवारी (दि. २९) सकाळी रमेश दावणीला बांधलेल्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी रानात गेला होता. चारा काढत असताना अचानक एका गव्याने रमेशच्या चेहºयावर जोरदार धडक दिली. तसेच त्याच्या बरगडीत शिंगे घुसवली. या हल्लात तो गंभीररीत्या जखमी झाला.
रमेशच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याच्याकडे धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रमेशला ग्रामस्थांनी तातडीने डोंगरापलीकडे असलेल्या खेड (ता. रायगड) येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने तसेच दुर्गम भागात दळणवळणाचे साधन नसल्यामुळे रमेशवर तत्काळ उपचार होवू शकले नाहीत.वन्यप्राण्यांचे सतत हल्ले
या परिसरात वन्यजीव संरक्षक हद्द तयार झाल्यामुळे चकदेव, शिंदी, पर्वत, वलवण, आरव, मोरणी, म्हाळुंगे या भागातील ग्रामस्थांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते सिताराम जंगम, संजय मोरे, अनिल मोरे व सिताराम भोसले यांनी या घटनेचा पंचनामा करण्याची मागणी बामणोली येथील वनविभागाचे अधिकारी बळीराम गावित यांच्याकडे केली आहे.