दीपक देशमुखसातारा : महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, या विभागाकडे अनेक प्रशासकीय कामांची जबाबदारी असते. त्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. परंतु, २०१७च्या शासन निर्णयानुसार सरळसेवा भरतीचा कोटा ७५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणला आहे, तर पदोन्नती तसेच वाहनचालकांच्या कायमस्वरूपी बदलीने भरला जाणारा कोटा वाढवल्यामुळे अजब पेच निर्माण झाला आहे. एकीकडे सरळसेवेद्वारे पदभरती करता येईना अन् वाहनचालक आणि पदोन्नतीची पदे भरलीच जात नाहीत, अशी स्थिती उद्भवली आहे.
सातारा जिल्ह्यात महसूल संवर्गात २५३ पदे मंजूर होती. त्यापैकी पुरवठा विभागाच्या सुधारित २०२३च्या आकृतिबंधामुळे महसूल विभागातील काही कर्मचारी पुरवठा विभागात काम करत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०३ महसूल संवर्गाची पदे मंजूर आहेत. २०१७ पर्यंत यातील ७५ टक्के पदे सरळसेवेने भरली जात होती. परंतु, ७ जून २०१७च्या शासन निर्णयानुसार महसूल संवर्गाचा कोटा ४०:५०:१० असा बदलण्यात आला. त्यामुळे सरळसेवेची ५० टक्क्यानुसार फक्त १०२, पदोन्नतीची ४० टक्क्यानुसार ८१ आणि वाहनचालकांमधून १० टक्क्यांनुसार २० पदे असा कोटा निश्चित झाला.
यामुळे सरळसेवेच्या कोट्यातील कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर संख्येपेक्षा ४६ने जास्त दिसू लागली. दुसरीकडे वाहनचालक आणि गट ड मधून पदोन्नतीने भरला जाऊ शकणारा कोटा वाढल्याने त्या जागा रिक्त दिसू लागल्या. गट डमधील पदोन्नतीने भरली जाणारी तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. ही पदे पूर्ण क्षमतेने भरली जातील, अशी शक्यताही कमी आहे. त्यामुळे २०१७ मधील शासन निर्णयातीलच तरतुदीनुसार सरळसेवेच्या पदांची संख्या आता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
..आता कंत्राटी वाहनचालकसध्या कार्यरत वाहनचालकांपैकी कोणाचीही क संवर्गात काम करण्याची मागणी नाही. तसेच वाहनचालक संवर्गातील पदे आता कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. त्यामुळे याद्वारे पदे भरली जाण्याची शक्यता नाही. त्यापेक्षा वाहनचालक संवर्गातून कायमस्वरूपी बदलीने महसूल सहायक संवर्गात नियुक्तीचे सध्याचे असलेले १० टक्के प्रमाण शिथिल अथवा कमी करणे आवश्यक आहे.
अनुकंपा तत्त्वावर भरतीतही अडथळा
सरळसेवेद्वारे मंजूर पदांची संख्या केल्यापासून या कोट्यात जास्त मनुष्यबळ आहे. सध्या ४६ कर्मचारी जास्त आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरही याठिकाणी भरती होणे अवघड बनले आहे.
मनुष्यबळावर ताण, बेरोजगारांना प्रतीक्षा
सध्या महसूलमधील मनुष्यबळावर ताण आहेच, शिवाय शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणारे शेकडो युवकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सरळसेवा भरतीची पदे वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.