रेठरे बुद्रुक : प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या बदल्यांचा प्राथमिक शिक्षकांनी चांगलाच धसका घेतला आहे. बदली आदेशाबाबत शिक्षकांमध्ये अद्याप संभ्रमावस्था आहे. बदल्यांसाठी अवघड आणि सोपे क्षेत्र अशी गावांची वर्गवारी केली असल्यामुळे बरीच वर्षे सोप्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. ऐन उन्हाळी सुटीच्या तोंडावर अन्यायकारक बदल्या होणार असल्यामुळे ‘बदलीचा भुंगा घालतोय पिंगा,’ अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे. आजपर्यंत एप्रिल, मे महिन्यात प्रशासकीय व विनंती स्वरूपाच्या तालुकास्तरावरून बदल्या होत होत्या. मात्र, २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये आता प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सेवा ज्येष्ठतेनुसारच मात्र जिल्हास्तरावरून आॅनलाईन पद्धतीने खो-खो स्वरूपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिक्षकांच्या नेमणुकीपासून जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील पात्र शिक्षकांना क्रमाने वीस शाळांचे पसंतीक्रम देण्यात येणार आहेत. या बदली प्रक्रियेमुळे बहुतांशी शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत आहे. या शाळांची गुणवत्ताही वाढली आहे. या कामी शिक्षकांनी चांगले काम केले आहे. मात्र, यंदाच्या जिल्हास्तरावरून होणाऱ्या बदल्यांमुळे काही शिक्षकांची सोय झाली तरी बहुतांश शिक्षकांची गैरसोय होणार आहे. तसेच जिल्हा सेवा ज्येष्ठता यादीमुळे सतत बदलीस पात्र राहण्याचा धोकाही आहे. जर आपली बदली वर्षभरात होणार आहे, अशी कल्पना शिक्षकांना आली तर त्याचे कार्यरत शाळेमध्ये ज्ञानदान करण्याकडे लक्ष राहणार नाही. तसेच जो शिक्षक अथवा शिक्षिका पती, पत्नीपैकी एकजण शिक्षक आहे त्यांना जिल्ह्यात कोठेही बदली होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांचे मानसिक संतुलनही बिघडू शकते. त्यामुळे या अन्यायकारक बदल्या होऊ नयेत, तालुकास्तरावरूनच बदल्या व्हाव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. सध्या तरी सर्व शिक्षक संघटना या बदल्यांच्या विरोधात एकवटल्या आहेत. शिक्षक संघटनांना बदल्या रद्द करण्यासाठी यश आले तर ठीक आहे. मात्र, बदल्या झाल्याच तर आपल्याला कोणते गाव मिळेल या विवंचनेत सध्या शिक्षक गुरफटले आहेत. सुटीच्या तोंडावरच शिक्षकांना बदलीच्या टेन्शनने घेरले आहे. त्यामुळे सध्या तरी बदल्या कधी आणि कशा पद्धतीने होतील, या विचारातच शिक्षक आहेत. (वार्ताहर)संघटनेची मोर्चाची तयारीअन्यायकारक बदल्या तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांच्या सर्व संघटना सध्या एक झाल्या आहेत. शासनाचे बदल्यांबाबतचे स्पष्ट धोरण आणि विविध मागण्यांबाबत समन्वय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन सध्या करण्यात येत आहे.
सुटीच्या तोंडावर बदलीचा भुंगा !
By admin | Published: April 21, 2017 10:27 PM