लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या संकटात फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. त्यांचे लसीकरण करण्यात यावे, याबाबत २० एप्रिल रोजी राज्य सहकार आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पतसंस्था फेडरेशनचे संचालक विनोद कुलकर्णी यांनी पालकमंत्री, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, कोरोनाच्या संकटात फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. त्यांना फिल्डवर राहूनच लोकांना सेवा द्यावी लागली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा लसीकरण कार्यक्रमात समावेश केला. परंतु बँका आणि पतसंस्था यांच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांना सापत्न वागणूक दिली, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. राज्य सरकारच्या ब्रेक दी चेन आदेशान्वये सर्व बँका व पतसंस्था आजही कार्यरत आहेत. सहकारी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने यामधील कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सामान्य जनतेशी अधिक संपर्क येतो. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहकारी बँका व पतसंस्था या राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरिकांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कार्यरत असल्याने त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने सातारा जिल्ह्यात करावी अन्यथा तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. याबाबत चार दिवसांत निर्णय न झाल्यास बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचारी व संचालकांना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाची पालकमंत्री व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.