सातारा : जिल्ह्यामध्ये ४५ वयावरील व्यक्तींचे लसीकरण योग्य नियोजन करून सुरू आहे. आतापर्यंत ४५ वयावरील ५० टक्के नागरिकांनी लस घेतली आहे. साताऱ्यातील हे लसीकरण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत प्रगतीपथावर आहे. सामूहिक प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे, हेच यानिमित्ताने समोर आलेले आहे.
याबाबतची माहिती अशी की, कोरोना विरुद्धच्या अनेक प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लसीकरण सुरू आहे. ४५ वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत जिल्ह्यात काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील ९ लाख ६३ हजार ४७ पैकी ४ लाख ७३ हजार ९८५ एवढ्या नागरिकांनी लस घेतली आहे. लसीकरणाचे जिल्हा, तालुका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्वच पातळ्यांवर अत्यंत सूक्ष्म नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे.
राज्यात सर्वत्र कोरोना लसीकरणाचे काम सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांचा विचार करता सातारा जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रगतीपथावर आहे. हे लसीकरण केवळ एखादा शासकीय उपक्रम म्हणून न राहता मोहीम पातळीवर राबविले जात आहे. जिल्हा पातळीपासून ते गावपातळीपर्यंतच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांची एकजूट आणि पूर्ण कसोशीने प्रयत्न यामुळे हे यश मिळत आहे, असे सांगण्यात आले. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा व इतर अधिकारी हे जिल्हा तसेच तालुका पातळीवर सातत्याने विविध माध्यमांद्वारे आढावा घेऊन पाठपुरावा करत आहेत. जिल्हास्तरावरील अधिकारी तसेच गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व शिक्षक अशा सर्वच पातळ्यांवर विशिष्ट अभ्यास करून प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशा विविध पदांवरच्या अधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांचे कार्यही प्रभावीपणे सुरू आहे. अंगणवाडीसेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी, आरोग्यसेवक, ग्रामसेवक असे सर्व घटक नियोजनाप्रमाणे लसीकरणाचे काम योग्यरित्या बजावत आहेत. केवळ तांत्रिकदृष्ट्या कर्तव्य न बजावता लोकांमध्ये प्रबोधन करणे लसीकरणासाठी उद्युक्त करणे असे विशेष प्रयत्न केले जात आहेत. सातत्याने विविध अधिकारी, कर्मचारी यांचा आढावा घेणे, नियोजनामध्ये योग्य ते बदल करणे, नागरिकांमध्ये प्रबोधन करणे असे विविध प्रयत्न केले जात आहेत, असेही सांगण्यात आले.
चौकट :
सूक्ष्म नियोजन, सामूहिक प्रयत्नामुळे यश : विनय गौडा
लसीकरण म्हणजे, केवळ उपक्रम असे न समजता ही मोहीम अत्यंत तळमळीने सर्वच घटक राबवित आहेत. तसेच हे केवळ उपक्रम न समजता नागरिकांच्या प्रबोधनावर भर दिला जात आहे. वारंवार आढावा घेणे, सूक्ष्म नियोजन करणे, सर्व घटकांची साथ घेणे, गावपातळीवरचे घटक विश्वासात घेणे अशा प्रयत्नांमुळे आपण अल्पावधीतच ५० टक्के लसीकरण पूर्ण करू शकलो. या यशामध्ये सातत्य टिकविण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. तसेच आपण लवकरच १०० टक्के यशस्वी होऊ, असा विश्वास मुख्य कार्यकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला. आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, महिला बालकल्याण, शिक्षण अशा सर्वच विभागांनी मनापासून कार्य केल्यामुळे हे यश मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
.........................................................................