पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोरोना लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले असून, अजूनही सुमारे पाच हजारांच्यावर लसींची गरज आहे. मात्र, लसीचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पुसेगाव हे खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १० हजारांच्या आसपास आहे. येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू असून, सध्या पुसेगाव व परिसरातील कोविडबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत निढळ, कटगुण, वर्धनगड, डिस्कळ, बुध यासह अनेक उपकेंद्रे कार्यरत आहेत. या भागात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाही पुसेगावसह भागातील नागरिकांकडून लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. उपलब्ध झालेल्या लसीनुसार दररोज सुमारे दीडशे ते दोनशे नागरिकांना लसीकरण करण्यात येते आहे. शासनाने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण खुले केल्याने या केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. त्यातच प्रशासनाच्या सूचनेनुसार गावातील अत्यावश्यक सेवा देणारे सर्व व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांना येत्या बुधवारपर्यंत कोरोना चाचणी सक्तीची केल्याने तपासणी केंद्रांवरही गर्दी होऊन बधितांचा आकडाही वाढत आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी टाळाटाळ करणारे नागरिक आता कोरोना प्रसार वाढल्याने मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहेत. पण, लसींचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने लसीच्या उपलब्धतेसाठी तातडीने उपाययोजना राबवून पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.