सातारा : तृतीयपंथी हा समाजातील उपेक्षित घटक. कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही त्यांच्या वाटेला उपेक्षाच आली; पण ‘लोकमत’ने त्यांची व्यथा जाणली. वृत्ताद्वारे त्यांची वेदना प्रशासन आणि समाजासमोर मांडली आणि अखेर तृतीयपंथी ‘लसवंत’ झाले. माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना कोरोना लस मिळाली.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला असताना, या लसीकरणात प्रत्येक घटकाचा, स्त्री आणि पुरूषांचा, लहान मुलांचा, वृद्धांचा सर्वांचा विचार केला गेला. त्या अनुषंगाने मोहिमेची रणनीतीही आखली गेली. वयानुसार लसीकरणाचे टप्पेही ठरवले गेले. मात्र, या प्रक्रियेत सर्वांनाच तृतीयपंथीयांचा विसर पडला. एरव्ही समाजात उपेक्षित असणारा हा घटक लसीकरणापासूनही वंचितच राहिला. त्यांना कोठेही लस मिळाली नाही. कोरोनामध्ये या समुदायातील काहीजणांना आपला प्राणही गमवावा लागला. मात्र, लसीकरणात या समुदायाला कुठेच जागा नव्हती. लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर त्यांना तेथेही नकारघंटा ऐकायला मिळाली. थातुरमातूर कारणे सांगून त्यांना झिडकारण्याचा प्रयत्न झाला. अखेर ‘लोकमत’ने तृतीयपंथीयांची ही वेदना जाणली.
‘कायदेशीर समाजाचे घटक असणारे ‘ते’ लसीकरणापासून वंचित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची माणदेशी फाऊंडेशनकडून दखल घेण्यात आली. सामाजिक कार्याला नेहमीच पाठबळ देण्याच्या या फाऊंडेशनने तृतीयपंथीयांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा निर्णय घेतला. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या या घटकाला फाऊंडेशनने हक्क मिळवून दिला. प्रशासनाशी चर्चा करून साताऱ्यात खास तृतीयपंथीयांसाठी लसीकरण मोहीम घेण्यात आली आणि या मोहिमेत २१ तृतीयपंथीयांना लस देण्यात आली.
(चौकट)
‘लोकमत’ आहे साथीला !
लसीकरणापासून वंचित असलेल्या तृतीयपंथीयांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने आवाज उठवला आणि ‘लोकमत’च्या साथीने माणदेशी फाऊंडेशनने लसीकरणाची ही मोहीम फत्ते केली. साताऱ्यात आयोजित या मोहिमेला जाण्याकरिता तृतीयपंथीयांसाठी वाहनांची तसेच त्यांच्या जेवणाची सोयही ‘माणदेशी’ने केली. ‘लोकमत’ची साथ आणि ‘माणदेशी’ची बांधिलकी यामुळेच हा वंचित घटक लसीकरणाच्या प्रवाहात आला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
(कोट)
एकीकडे आपण आपला समाज पुढारलेला आहे, असं म्हणतो अन् दुसरीकडे याच समाजाचा एक घटक असलेल्या तृतीयपंथीयांना लस मिळत नाही, यासारखं दुर्दैव काय असू शकतं. आज माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना लस मिळाल्याने खूप आनंद झाला. ‘लोकमत’ने तृतीयपंथीयांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे.
- रेखा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी
फोटो : १६ माणदेशी लसीकरण
साताऱ्यात आयोजित शिबिरात तृतीयपंथीयांना कोरोना लस देण्यात आली. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या चेतना सिन्हा उपस्थित होत्या.
लोगो : ‘लोकमत’चा प्रभाव