फलटण : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे सातारा जिल्ह्यात प्रथमच समाजातील दुर्लक्षित दिव्यांगांचे लसीकरण, कोरोना चाचणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये तालुक्यातील पवारवाडी, आसू, हणमंतवाडी, साठे, तामखडा, खटकेवस्ती, सरडे, फलटण, सासकल, कुरवली खुर्द, कुरवली बुद्रुक, दुधेबावी, राजुरी, मठाचीवाडी, रेवडी आदी गावांतील १८ वर्षांपुढील पुरुष, महिला, मुले-मुली या दिव्यागांना लसीकरण व कोरोना चाचणी करण्यात आले.
यावेळी सायकलिंग, दोरीवरील उड्या विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल स्वरा योगेश भागवत या सहा वर्षीय चिमुकलीचा आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या सरडे येथील प्रवीण जाधव कुटुंबीयांचा राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे स्वीसहायक गौरव जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवावर उदार होऊन मोफत वैद्यकीय उपचार करणारे गावातील डॉ. शिवाजीराव गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. विकास खटके, डॉ. सानिया शेख, आरोग्य सेविका लोंढे, आशा सेविका दुर्गा आडके, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे, सरपंच सुमन गावडे, शंभूराज खलाटे, विकास नाळे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, शेखर गाढवे, प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, मंगेश ढमाळ, महेश जगताप, बापूराव खरात, सुभाष मुळीक, अशोक गोतपागर, मनीषा जगदाळे, दस्तगीर पठाण, प्रणित भिसे, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी आभार मानले.