मसूर : मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात चाललेल्या कोरोना लसीकरणाबाबत चार दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात उलटसुलट चर्चा आहे. २३ गावांतील सर्वसामान्य नागरिक ‘आपणाला लस मिळणार का?’ या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. कलगीतुऱ्यांपेक्षा लसीकरणात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांंचात समन्वय असणे गरजेचे आहे. अन्यथा जनतेवर बिनपैशाचा तमाशा बघण्याची वेळ येईल.
मसूर आरोग्य केंद्रातील गुरुवारच्या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप झाले आहेत. मात्र ही वेळ भांडणाची नाही, हे दोन्ही बाजूंकडील लोकांनी समजून घेऊन कलगीतुरा रंगवण्याऐवजी सर्वसामान्यांना लस कशी मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सरकार यावर उपाय म्हणून लसीकरण मोहीम राबवत आहे, एक तर प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध आहे का नाही? हेच २३ गावांतील ग्रामस्थांना कळत नाही. लस घ्यायची म्हणून ग्रामस्थ सकाळी उपाशी प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता धरतात. येथे आल्यावर सकाळी ११ वाजता त्यांना कळते की ‘आज लस नाही? तोपर्यंत आलेले लोक वाट पाहत ताटकळत बसलेले असतात. किती लोकांना पुरेल एवढी लस आली आहे, हे येथील डॉक्टरांना हे माहिती असते. यावर उपाय म्हणून तेथे एका आरोग्य कर्मचाऱ्याची नेमणूक करून आलेल्या लोकांची गेटवरच विचारपूस करून पहिल्या डोससाठी आले आहेत का दुसऱ्या डोससाठी आले आहेत, याची विचारपूस करून लसीच्या प्रमाणात टोकन देऊन त्यापुढील नागरिकांना लस असेल त्यादिवशी बोलवले तर कोणताही गोंधळ होणार नाही.
मसूर आरोग्य केंद्रात सोमवारी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी चाललेला प्रकार पाहून डॉ. लोखंडे यांना खडे बोल सुनावले. सकाळपासून उपाशी आलेले लोक रांगेत उभे आहेत त्यांना ११ वाजले तरी लसीकरण होणार का नाही? माहिती नव्हते परंतु निवास थोरात हे रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष असल्याने ते आत गेले तर त्यांना दरवाजा बंद असताना आतमध्ये दहा ते बारा जणांचे लसीकरण पूर्ण झालेले दिसले. त्यावर त्यांनी डॉक्टरांना विचारले असता ते निरुत्तर झाले. यावर संतापून त्यांनी लसीकरण तीन तास बंद पाडले. डॉ. रमेश लोखंडे यांनी आपण वैद्यकीय रजेवर जात असल्याचे पत्र प्रशासनास दिले.
यावर लगेच दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत व ग्रामस्थ मसूर यांनी या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.
डॉ. लोखंडे यांनी भरीव काम करुन आजपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य थोरात यांनी त्यांच्यासंबंधी वरिष्ठांकडे तक्रार करावयाची होती परंतु तसे न करता शासकीय कामात अडथळा आणून तीन तास लसीकरण बंद पाडले हेही योग्य नव्हते, असे पत्रकार परिषदेत सांगितले.
परंतु हे दोन्ही प्रकार ग्रामस्थांच्या हिताचे नाहीत, तर यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी एकत्र बसून यावर निर्णय घेऊन एकमत करावे व लसीकरण पूर्ण करावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.